आंतरराष्ट्रीय योगदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

रांची : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी येथील प्रभात तारा मैदानावर ४० हजार उत्साही नागरिकांसोबत योगासनांच्या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांनी विविध प्रकारची योगासने केली. योगविद्या ही जात, धर्म, रंग, लिंग आणि प्रदेश यांच्याहूनही अधिक श्रेष्ठ आहे, असे या वेळी नरेंद्र मोदी म्हणाले. योगविद्येला आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनविण्याचे आवाहनही या वेळी मोदी यांनी केले.

योगाभ्यास शहरांमधून गावांकडे आणि तेथून आदिवासी विभागांकडे पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असे मोदी म्हणाले. योगदिनानिमित्तचा मुख्य कार्यक्रम शुक्रवारी झारखंडची राजधानी असलेल्या रांचीमध्ये आयोजित करण्यात आला होता.

योगविद्या अनेक शतकांपासून निरंतर आहे. योगविद्या ज्ञान, कर्म आणि भक्ती यांचे मिश्रण आहे, याचे स्मरण मोदी यांनी उपस्थितांना करून दिले. ते म्हणाले की, हृदयाशी संबंधित विकार देशात बळावत चालले आहेत. त्यासाठी हृदयाची काळजी, योगविद्येद्वारे विकारांना अटकाव आणि योग्य उपचार गरजेचे आहेत. आरोग्याची काळजी घेण्यासाठी योगविद्या हाच प्रमुख स्तंभ करण्याच्या दृष्टिकोनातून सरकार काम करीत आहे. भारतामध्ये योगविद्येबाबत कानाकोपऱ्यात जनजागृती झाली आहे, असेही मोदी यांनी सांगितले.

उत्तम आरोग्यामुळे नवी उंची गाठण्यास मदत होते. थकलेले शरीर आणि दुभंगलेले मन यामुळे स्वप्न साकार होत नाहीत किंवा उद्देशही साध्य होत नाही. त्यामुळे शहरांपासून खेडय़ांकडे आणि तेथून आदिवासी क्षेत्रांकडे योगविद्या पोहोचविण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, असेही या वेळी पंतप्रधान म्हणाले.

‘हृदयासाठी योगविद्या’

तरुण वयातच हृदयविकार जडत असल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमात चिंता व्यक्त केली. या प्रश्नावर योगविद्या अत्यंत उपयुक्त ठरू शकते असे ते म्हणाले. ‘हृदयासाठी योगविद्या’ अशी या वर्षीची संकल्पनाही त्यांनी मांडली.