Israel Iran Tensions : इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव वाढत असून इराणने त्यांच्या हद्दीतून इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्र हल्ला चढवला आहे. इराणमधून १०० हून अधिक ड्रोन सोडण्यात आले, असं इस्रायलच्या सैन्यांनी सांगितलं असल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.

इस्रायलचे लष्करी प्रवक्ते रिअर अॅडमिरल डॅनिअल हगरी यांनी सांगितलं की, इराणने इस्रायलवर जमिनीवरून मारा करणारे डझनभर क्षेपणास्रे डागली होती. त्यापैकी बहुतांश क्षेपणास्रे सीमेबाहेरच रोखण्यात आली. यामध्ये १० हून अधिक क्रुझ क्षेपणास्रांचा समावेश आहे. इराणी सॅल्व्होने आतापर्यंत २०० हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्रे डागली आहेत. तसंच, इस्रायली लष्करी सुविधेचेही नुकसान झाले आहे, असंही हगरी म्हणाले.

इस्रायलशीसंबंधित जहाजावर केला कब्जा

इस्रायलने १ एप्रिल रोजी इराणच्या सीरियामधील दूतावासावर हल्ला केल्यानंतर या दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचला आहे. या हल्ल्यात दोन लष्करी अधिकाऱ्यांसह ‘रिव्हॉल्यूशनरी गाडर्स्’चे सात कर्मचारी मारले गेले होते. या हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी इराणने दिल्यानंतर शनिवारी इस्रायलशी संबंधित जहाज ताब्यात घेण्यात आले. तसंच, इराणने इस्रायलवर ड्रोन हल्ला चढवला.

हेही वाचा >> Iran Attack Israel Live : इराणकडून ३०० पेक्षा जास्त ड्रोनचा मारा, ‘या’ देशांतूनही इस्रायलवर हल्ला!

सुटकेसाठी भारताचे प्रयत्न

इराणने ताब्यात घेतलेल्या मालवाहू जहाजात १७ भारतीय कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी भारत सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. भारतीय नागरिकांची सुरक्षा, कल्याण आणि सुटका सुनिश्चित करण्यासाठी तेहरान आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी राजनैतिक माध्यमांद्वारे इराणी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला आहे, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

इराणच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तेल अवीव येथील लष्करी मुख्यालयात इस्रायलच्या युद्ध मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. दरम्यान, इराणने क्षेपणास्रे डागल्याने इस्रायलने संभाव्य परिस्थितीसाठी सुरक्षा यंत्रणा तैनात केल्या आहेत. तसंच कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीसाठी इस्रायल सज्ज असल्याचंही सांगण्यात आलं आहे. बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि इतर राष्ट्रांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले.

हेही वाचा >> इस्रायलशी संबंधित जहाजावर इराणचा कब्जा; १७ भारतीय कर्मचारी संकटात

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आज तातडीची बैठक

इराणने इस्रायलवर केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची रविवारी तातडीची बैठक होणार आहे. तसंच, इराण आणि इस्रायलच्या संघर्षात अमेरिकेने दूर राहावं, असा इशाराही इराणने अमेरिकेला दिला आहे.