मीर इम्तियाझ यांच्या फेसबुकवर दहशतवाद्यांच्या नावे खुले पत्र

‘जो काश्मीरवर प्रेम करत होता, अशा एका माणसाला तुम्ही ठार मारले आहे..या आणि आम्हा सर्वाना मारून टाका’, असे जम्मू- काश्मीर पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक मीर इम्तियाझ यांच्या एका कुटुंबियाने सोमवारी फेसबुकवरील पोस्टमध्ये लिहिले. मीर याची दहशतवाद्यांनी रविवारी गोळ्या घालून हत्या केली होती.

‘पोलीस उपनिरीक्षक मीर इम्तियाझ याच्या खुन्यांच्या नावे खुले पत्र’, या शीर्षकाने मृत पोलीस अधिकाऱ्याच्या फेसबुक पेजवर हा मजकूर टाकण्यात आला आहे. ‘एका वृद्ध आईच्या लाडक्या मुलाला आणि एका वृद्ध बापाच्या आज्ञाधारक मुलाला तुम्ही मारून टाकले आहे’, असे यात अज्ञात लेखकाने म्हटले आहे.

‘आपल्या भाऊ- बहिणांचा एकमेव आधार असलेल्या भावाला तुम्ही मारले आहे. या अधिकाऱ्याशी लग्न करू इच्छिणाऱ्या एका तरुणीचे प्रत्येक स्वप्न तुम्ही उद्ध्वस्त केले आहे’, असेही या पोस्टमध्ये लिहिले आहे. मीर याचे वर्णन यात अभ्यासात, तसेच व्यवसायात उत्कृष्ट कामगिरी करणारा धर्मनिष्ठ मुसलमान असे करण्यात आले आहे.

‘तुम्ही सुफीवादी विचार असलेल्या माणसाला मारले आहे..असा माणूस, ज्याने सुफी साहित्य भरपूर वाचले होते..ज्याने कार्ल मार्क्‍ससह प्रत्येक विचारधारा वाचली होती..पदव्युत्तर पदवीत अव्वल राहिलेल्या माणसाला, त्याच्या पोलीस उपनिरीक्षकाच्या तुकडीत सर्वात वरच्या क्रमांकावर असलेल्या माणसाला तुम्ही मारले आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जो काश्मीर आणि तेथील माणसांवर जिवापाड प्रेम करत होता, अशा एकाला तुम्ही मारले आहे. एक आनंदी काश्मीर पाहणे ही त्याची एकमेव इच्छा होती’, असे या खुल्या पत्रात नमूद केले आहे.

‘मीर हा त्याचे वृद्ध आईवडील आणि व्यथाग्रस्त बहिणीला भेटण्यासाठी जात असताना त्याला मारण्यात आले. पण जेव्हा तुम्ही त्याला मारले, तुम्ही आम्हा सर्वाना मारले नाही. तुम्ही त्याचे आईवडील, बहीण, भाऊ आणि त्याच्यासोबत आयुष्य घालवू इच्छिणारी स्त्री यांना मारले नाही. आता कुणी त्या सर्वाची समजूत कोणत्या शब्दांत घालू शकेल? मीरच्या खुन्यांनी आम्हा सर्वाना का मारून टाकले नाही, असे आम्ही त्यांना विचारू इच्छितो. कृपा करून या आणि आम्हा सर्वाना मारून टाका.आम्ही त्याच्याशिवाय राहू शकत नाही.’, असे या भावनोत्कट पत्रात म्हटले आहे.

३० वर्षे वयाचा मीर हा रविवारी त्याच्या घरी जात असताना दक्षिण काश्मीरमधील दहशतवादग्रस्त पुलवामा जिल्ह्य़ातील वाहिबाग येथे दहशतवाद्यांनी त्याला गोळ्या घालून ठार मारले होते. मीर याच्या जिवाला धोका असल्याबद्दल त्याला सावधगिरीचा इशारा देण्यात आला होता.

आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी आतुर असलेल्या मीरने रूप बदलण्यासाठी  दाढीही काढून टाकली होती. मात्र दहशतवाद्यांनी त्याच्या खेडय़ात रचलेला मृत्यूचा सापळा तो चुकवू शकला नाही, असे त्याच्या सहकाऱ्यांनी रविवारी सांगितले.