सुरक्षा दलांनी ‘जैश- ए- मोहम्मद’या दहशतवादी संघटनेला सोमवारी दणका दिला. ‘जैश’चा प्रमुख मसूद अझहरचा भाचा तलहा रशिदला सुरक्षा दलांनी चकमकीत कंठस्नान घातले आहे. रशिद हा ‘जैश’चा काश्मीरमधील कमांडर होता.

पुलवामा जिल्ह्यातील अलगार कंडी पट्ट्यामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. सोमवारी संध्याकाळी सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम सुरु केली होती. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. या गोळीबारात एक जवान शहीद झाला होता.

सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर देत तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या तिन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. ‘जैश’चा कमांडर तलहा रशिद, मोहम्मद भाई आणि वसीम अशी त्यांची नावे आहे. मोहम्मद भाई हा देखील ‘जैश’चा कमांडर असून तो पाकिस्तानचा असल्याचे समजते. तर वसीम हा मूळचा पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. ‘जैश- ए- मोहम्मद’च्या प्रवक्त्यानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मसूदच्या भाच्याचा खात्मा झाल्याने ‘जैश’ला मोठा हादरा बसल्याचे सांगितले जाते. या तिघांकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या अमेरिकन बनावटीची रायफल असल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये Jammu and Kashmir सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात सुरू केलेल्या ऑपरेशनला मोठे यश मिळत असू सुरक्षा दलांनी गेल्या ६ महिन्यांमध्ये ८० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. दक्षिण काश्मीरमध्ये अद्याप ११५ दहशतवादी सक्रीय असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली असून १०० दहशतवादी स्थानिक आहेत. तर १५ दहशतवादी पाकिस्तानचे आहेत, असे समजते.