श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. पंथा चौक येथे झालेल्या या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी शहीद झाला असून इतर ७ जण जखमी झाले आहेत. या चकमकीनंतर संपूर्ण परिसर रिकामे करण्यात आले आहे. दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या गोळीबारात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी शहीद झाल्याचे सांगण्यात येते. कर्तव्यावरून काश्मिर आर्म्ड पोलीस मुख्यालयाकडे परतत असणाऱ्या पोलीस पथकावर हा हल्ला करण्यात आला. लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेने ही जबाबदारी घेतली असून सुरक्षा पथकांनी परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

पुंछमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन

दुसरीकडे पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. शुक्रवारी संध्याकाळी पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यामध्ये सीमा सुरक्षा दलाच्या उपनिरीक्षकाला वीरमरण आले. भारतीय जवानांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले.

पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. दि. २६ ऑगस्टला राजौरी जिल्ह्यात सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराने नाहक गोळीबार केला होता. यावेळीही भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात किमान ३ पाकिस्तानी रेंजर्स मारले गेले होते. गत शुक्रवारी जम्मूच्या आरएस पुरा सेक्टरमध्येही पाकिस्तानने गोळीबार केला होता. यात एक भारतीय जवान जखमी झाला होता.