पाकिस्तानी जनता अजूनही बालाकोट एअर स्ट्राइक विसरलेली नाही. सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांच्या मनात अजूनही या एअर स्ट्राइकचे भय कायम आहे. मंगळवारी रात्री पुन्हा एकदा याची प्रचिती आली. इंडियन एअर फोर्सची फायटर विमानं नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात घुसली आहेत. कराचीच्या आकाशात ही विमान घिरटया घालत आहे अशी चर्चा मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी पाकिस्तानी सोशल मीडियावर रंगली होती.

IAF च्या फायटर विमानांमुळे कराचीमध्ये काळोख करण्यात आला असे पाकिस्तानच्या एका सोशल मीडिया युझरने म्हटले आहे. कराचीमध्ये ब्लॅकआऊट झाल्याने भारताच्या फायटर विमानांनी बालाकोट सारखा पुन्हा एअर स्ट्राइक केला असे काही जणांनी टि्वटरवर म्हटले होते.

कराची शहराजवळ IAF ची विमाने उड्डाण करताना दिसल्यामुळे काळोख करण्यात आला असे काही टि्वटर युझर्सनी म्हटले आहे. ‘विमानतळाजवळ मी जेट विमाने बिघतली व्हॉट्स अप’ असे कराचीमधल्या लारैब मोहीबने विचारले. ‘कराचीजवळ अनेक फायटर विमाने उड्डाण करत आहेत’ असे कराचीमधल्या आणखी एका रहिवाशाने सांगितले.

“IAF ची फायटर विमाने पीओके आणि सिंधमध्ये घुसल्याच्या अफवा पसरल्या आहेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान दोघांनी नेमकं काय ते स्पष्ट करांव. आता सर्वांनी शांतपणे झोपा” असे पाकिस्तानी पत्रकार वज खान यांनी टि्वट केलं. काहींनी रात्रीच्या अंधारातील फायटर विमानांच्या आवाजाचे व्हिडीओ सुद्धा पोस्ट केले आहेत.