भारतीय लष्काराविरूद्ध लढण्यासाठी काश्मिरींना पाकिस्ताननं ट्रेनिंग दिलं, अशी कबूली देणारी पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांची मुलाखत व्हायरल झाली आहे. काश्मीरमधील हिंसाचाराविषयी बोलताना मुशर्रफ यांनी हा खुलासा केला आहे. दहशतवादी ओसामा बिन लादेन आणि जलालुद्दीन हक्कानी हे पाकिस्तानी हिरो होते, असंही त्यांनी म्हटलं आहे.

भारतात हल्ले करण्यासाठी दहशतवादी संघटनांना पाकिस्तानकडून खतपाणी घालण्यात येतं, असं भारतानं पुराव्यानिशी वारंवार जागतिक व्यासपीठावर दाखवून दिलं आहे. मात्र, याचा पाकिस्तानकडून सातत्यानं इन्कार केला जातो. दरम्यान, पाकिस्ताननं दहशतवादी संघटनांना तयार केल्याची कबूली देणारी पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांची मुलाखत सोशल माध्यमात व्हायरल झाली आहे. या मुलाखतीत त्यांनी दहशतवादी संघटनांना प्रशिक्षण देण्यापासून रसद पुरण्यापर्यंत पाकिस्ताननं मदत केल्याचं म्हटलं आहे. “१९७९मध्ये सोव्हिएत युनियनला अफगाणिस्तानातून बाहेर काढण्याबरोबर पाकिस्तानला फायदा होण्यासाठी आम्ही धार्मिक लष्काराची सुरूवात केली. आम्ही जगभरात मुजाहिद्दीन अर्थात जिहादी शोधले. त्यांना ट्रेनिंग दिलं. शस्त्रास्त्र पुरवली. ते आमचे हिरो होते. हक्कानी आमचा हिरो होता. ओसामा बिन लादेन आमचा हिरो होता. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आजची वेगळी आहे. तेव्हा ते आमचे हिरो होते. आता व्हिलन झाले आहेत,” असं मुशर्रफ यांनी सांगितलं.

याच मुलाखतीत काश्मिरातील अस्थिरतेवर बोलताना मुशर्रफ यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. “जे काश्मिरी पाकिस्तानात येत त्यांचं स्वागत हिरोसारखं केल जायचं. धर्मयोद्धे म्हणूनच आम्ही त्यांच्याकडं बघायचो. काश्मीरमध्ये भारतीय लष्कराविरूद्ध लढण्यासाठी आम्ही त्यांना ट्रेनिंग दिलं. पाठिंबा दिला. त्यानंतर भारतीय लष्करावर हल्ले करणारी लष्कर ए तोयबासारखी दहशतवादी संघटना उदयास आली. ते आमचे हिरो होते,” असं खुलासा मुशर्रफ यांनी या मुलाखतीत केला आहे.

काश्मीर खोऱ्यासह भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानकडून सातत्यानं दहशतवादाचा वापर करण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतरही पाकिस्तानकडून सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. तसेच दहशतवादी घुसवण्याचेही प्रयत्नही करण्यात आले आहेत.