भारतासह दक्षिण आशियातील अनेक देशांमध्ये बदलत्या जीवनशैलीसंदर्भातील असंसर्गीय विकाराचा प्रसार होत आहे. मधुमेह, हृदयविकार, पक्षाघात, कर्करोग आदी विकार असलेल्या रुग्णांमध्ये बदलत्या जीवनशैलीमुळे वाढ होत आहे. या विकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियातील वैद्यकीय तज्ज्ञ संशोधन करत असून, हे संशोधन पूर्ण झाल्यास आरोग्यसंदर्भातील ते मोठे यश मानण्यात येणार आहे.
आरोग्यतज्ज्ञांच्या या संशोधन प्रकल्पाचे नाव आहे इनकोर (ENCORE). म्हणजेच एक्सलेन्स इन नॉन कम्युनिकेबल डिसीज रिसर्च. या प्रकल्पाचे नेतृत्व प्रा. ब्रायन ओल्डनबर्ग करत असून ऑस्ट्रेलिया व भारतातील तरुण शास्त्रज्ञ या प्रकल्पासाठी काम करत आहेत. भारत आणि दक्षिण आशियातील अल्प व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमधील असंसर्गीय विकारांवर प्रतिबंध आणि नियंत्रण आणणे हा या प्रकल्पामागचा उद्देश आहे.
‘‘सध्या एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूमागील कारण जीवनशैलीसंदर्भातीलच असते. विकसनशील देशांमध्ये तर मधुमेह, पक्षाघात, हृदयविकाराचा झटका, कर्करोग या असंसर्गीय आजारानेच अनेकांचा मृत्यू होत असल्याचे चित्र आहे. भारत आणि अल्प व मध्यम उत्पन्न असलेल्या अनेक देशांमध्ये तर ८० टक्के मृत्यू याच विकारांमुळे होतात,’’ असे प्रा. ब्रायन ओल्डनबर्ग यांनी सांगितले. हे विकार दीर्घकाळ राहतात. त्याचा मानसिक त्रास रुग्णासह त्याच्या कुटुंबीयांना व नातेवाईकांनाही होत असतो. या विकारांवर नियंत्रण आणण्यासाठी आणि त्यांचा प्रतिबंध करण्यासाठी तातडीच्या संशोधनाची गरज होती. त्यामुळे आम्ही हा प्रकल्प हाती घेतला, असे ओल्डनबर्ग म्हणाले. हे संशोधन पुढील तीन वष्रे चालणार असून मेलबर्न विद्यापीठ, भारतीय सार्वजनिक आरोग्य प्रतिष्ठान, ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स(एम्स), ख्रिश्चन मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटल आणि केरळमधील श्री चित्रा तिरूनाल इन्स्टिटय़ूट फॉर मेडिकल सायन्स या संस्था या प्रकल्पासाठी कार्यरत आहेत. या संस्थांमधील ४० वैद्यकीय तज्ज्ञ संशोधनाचे काम करत असल्याचे ओल्डनबर्ग यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलिया व भारत या देशांमधील असंसर्गीय विकारांबाबतचे याआधी झालेले संशोधन अभ्यासण्यात येणार आहे. ऑनलाइन वेब परिषद घेऊन यासंदर्भात चर्चा करण्यात येईल. यासंदर्भात अत्याधुनिक संशोधन अभ्यासून विविध संस्थांना भेटी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर कार्यशाळा घेणे, जागतिक परिषदांना उपस्थिती लावणे आदी कार्यक्रमही हाती घेतले आहेत. अमेरिका व इंग्लंड या देशांनी यासंदर्भात केलेले संशोधन अभ्यासण्यात येणार आहे.
–  प्रा. के. आर. थानकप्पन, वैद्यकीय  तज्ज्ञ.