महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काही गावात तर दैनंदिन कामासाठी वापरलं जाणारं पाणीही मैलभर पायपीट केल्यावर मिळते. रात्री-अपरात्री महिलांना पाणी भरण्यासाठी उठावे लागते. त्यामुळे मुलांना लग्नासाठी कुणी मुली देण्यास तयार नाही. होय! हे वास्तव आहे. यवतमाळमधील उंबरीपठार गावातील हे भयाण वास्तव आहे. येथील तरूणांनी तिशी-चाळीशी ओलांडली मात्र, अनेकांची लग्न झाली नाहीत. कारण, गावात पाणी नसल्यामुळे सोयरीक करण्यास कोणी तयार होत नाही. गावातील गजानन पवार या तरुणाची बायको रात्री अपरात्री पाण्यासाठी जावं लागतं होतं म्हणून सोडून गेली आहे.

उंबरीपठार गावात ३० वर्षीय राजेश फुलशींग राठोड सांगतो, गावात पाण्याची अतिशय भयंकर परिस्थिती आहे. मैल दूर गेल्यानंतर पाणी मिळते. पाण्यामुळे गावात मुली द्यायलाही कोणी तयार होत नाही. माझं लग्न झालंय. मात्र, तीन-चार वेळा माझी सोयरीक जुळता-जुळता तुटली. फक्त गावातील पाण्याच्या समस्येमुळे.

४० वर्षे झाली तरीही येथील काही तरूण लग्नासाठी मुलीच्या प्रतीक्षेत आहेत. पाण्यामुळे कोणी गावात सोयरीक करायला तयार होत नाहीत. गावातील पाण्याच्या या भयाण समस्येमुळे कोणी आपणहून सोयरीक जोडत नाही तर काही ठिकाणी उंबरीपठार नाव ऐकताच मुलीला देण्यास नकार देतात.

माझ्या लग्नाच्या वेळी वधूपक्षाच्या मंडळींना मला विनंती करायला लागली. गावात लवकरच पाणी आणू असे आश्वासनही द्यावे लागले. त्यानंतर कुठे माझे लग्न झाले. माझे तर लग्न झाले मात्र, गावातील इतर तरुणांचं काय होणार हे अनुत्तरीतच आहे. एखादी मुलगी गावामधून बाहेर लग्न होऊन चालली की, ‘सुटले या त्रासातून’ असे म्हणत आनंदाने जाते. या भीषण पाणी समस्येवर उपाय शोधायला पाहिजे. सरकारनेही मदत करायला हवी.