एक्झिट पोलच्या अंदाजानुसार लोकसभा निवडणुकांचे निकाल येत असल्याचे पाहून अॅक्सिस My India चे सीएमडी प्रदीप गुप्ता यांना इंडिया टुडे वृत्तवाहिनीवरच आनंदाने रडू कोसळले. अॅक्सिस My India च्या एक्झिट पोलवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. एक्झिट पोलच्या अंदाज वर्तवण्याच्या पद्धतीवर अनेकांनी टीका केली होती. पैसे घेऊन चुकीची माहिती देत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

त्या पार्श्वभूमीवर वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात अंदाजानुसार निकाल येत असल्याचे पाहून त्यांना आनंदाने रडू कोसळले. अॅक्सिस My India ने त्यांच्या एक्झिट पोलमध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ३३९ ते ३६५ जागा मिळतील तर काँग्रेसप्रणीत संपुआला ७७ ते १०८ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. आता निकाल सुद्धा तसेच येत आहेत. भाजपाला ३५० जागांवर आघाडी आहे. आठ लाखापेक्षा जास्त मतदारांशी बोलून हा एक्झिट पोल तयार करण्यात आला होता.

मागच्या ४० दिवसांपासून प्रत्येक लोकसभा मतदारसंघात आणि विधानसभा मतदारसंघात काम करणाऱ्या माझ्या टीमवर मला पूर्ण विश्वास होता. अचूक प्रश्न विचारण्याचे दिलेले प्रशिक्षण हा आमच्या यशाचा महत्वपूर्ण भाग आहे. सर्वात मोठे यश आहे. असे प्रदीप गुप्ता यांनी सांगितले.

नेमके काय चुकले ?
एक्झिट पोलमध्ये जागानिहाय सर्वाधिक लोकप्रिय पक्ष या भागात उत्तराखंडमधील पाच मतदारसंघाची नावे आहेत. सादुलशहर, गंगानगर, करणपूर, सुरतगढ आणि रायसिंह नगर अशा पाच मतदारसंघांचा समावेश होता. या ठिकाणी भाजपा बाजी मारणार असा अंदाज वर्तवण्यात आला. पण हे पाच मतदारसंघ विधानसभेचे होते आणि त्यांना लोकसभा मतदारसंघ दाखवण्यात आले. उत्तराखंडमध्ये टिहरी गढवाल, अलमोडा, गढवाल, हरिद्वार आणि उधमसिंह नगर असे पाच लोकसभा मतदारसंघ आहेत.