काँग्रेस किंवा गांधी कुटुंबीयांचा पारंपरिक बालेकिल्ला असलेला नंदुरबार मतदारसंघ गेल्या वेळी भाजपने काँग्रेसकडून पटकविला होता. यंदाही भाजपाच्या हिना गावित यांनी 95 हजार 629 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. उत्तर महाराष्ट्रातली नंदुरबार मतदार संघातून हिना गावित यांनी सहा लाख 39 हजार 136 मते घेत दणदणीत विजय मिळवला आहे. तर काँग्रेस उमेदवार के.सी.पाडवी यांना 5 लाख 41 हजार 930 मते मिळाली.

उत्तर महाराष्ट्रातली नंदुरबारची जागा आदिवासीबहुल आहे. यावेळी ही जागा अनुसूचित जातीजमातींसाठी राखीव आहे. एकूण मतदानाच्या 49.86 टक्के मते हिना गावित यांना तर 42.4 मते पाडवी यांना मिळाली आहे. गावित यांना 1910 पोस्टल मते मिळाली तर पाडवींच्या पदरी 1577 पोस्टल मते पडली आहेत.

स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला नंदुरबार मतदारसंघ गेल्या निवडणुकीत प्रथमच भाजपने डॉ. हिना गावितांच्या माध्यमातून काबीज केला होता. गेल्या काही दिवसांपासून या मतदारासंघात भाजपामधील अंतर्गत गटबाजी समोर आली होती. त्यामुळे गावित यांच्यासाठी ही निवडणूक कठीण जाईल असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, हिना गावित यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे.

खासदारकीच्या कार्यकाळात डॉ. हिना गावित यांनी रेल्वे दुहेरीकरणाच्या कामाला अधिकचा निधी आणण्यासाठी प्रयत्न करीत नंदुरबार-सूरत रेल्वे मार्गाच्या कामाला गती दिली. जिल्ह्य़ातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणासाठी कोटय़वधींचा निधी आणला. केंद्राने सुरू केलेल्या उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून जिल्ह्य़ात दीड लाख गॅस जोडणीचे वाटप करत अडीच वर्षांनंतर डॉ. हिना गावितांनी दुर्गम भागातील घराघरात पोहोचण्याची धडपड केली. ‘हर घर बिजली’ अभियानातून जवळपास एक लाखाहून अधिक घरांना स्वातंत्र्यानंतरची पहिली वीज जोडणी. केंद्रीय विद्यालय, एकलव्य विद्यालयांना मंजुरी आदी विकासकामे ही हिना गावित यांची जमेची बाजू ठरली.