यांत्रिक बाहू असलेल्या लहान पाणबुडीने हिंदी महासागराच्या खोलवरच्या भागात जाऊन मलेशियाच्या एमएच-३७० या विमानाच्या अवशेषांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. एकूण शोध क्षेत्रापैकी दोन तृतीयांश भागाचा शोध पूर्ण झाला असून त्यात काहीही हाती लागलेले नाही.
दरम्यान, कटिबंधीय वादळाची शक्यता असल्याने या विमानाचे अवशेष शोधण्यात आता अडथळे येत आहेत. अमेरिकी नौदलाच्या ब्लू फिन -२१ या जल वाहनाने ज्या भागात चार पिंग संदेश मिळाले होते तेथे शोध घेतला असून त्याने आठवी शोध मोहीम पूर्ण केली. त्याला ‘सोनार’ नावाचे यंत्र लावलेले असून आतापर्यंत दोन तृतीयांश भागाचा वेध घेतला आहे, असे पर्थ येथील संयुक्त समन्वय केंद्राने म्हटले आहे.
विमान बेपत्ता होऊन ४५ दिवस उलटले असून अद्याप त्याचा काहीच पत्ता लागलेला नाही. कुठलेही ठोस संदेशही प्राप्त झालेले नाहीत. या बोईंग ७७७-२०० विमानाचा शोध घेण्यासाठी १० लष्करी विमाने व ११ जहाजे तैनात करण्यात आली आहेत. ८ मार्चला हे विमान क्वालालंपूर येथून बीजिंगला निघाले व मधल्या अवधीत बेपत्ता झाले.
दरम्यान जॅक हे कटिबंधीय वादळ दक्षिणेकडे सरकत असून शोधकार्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. पिंग लोकेटरने दिशादर्शित केलेल्या दहा कि.मी. त्रिज्येच्या परिसरात विमानाचा शोध घेतला जात आहे. या विमानाचा ब्लॅक बॉक्स न सापडल्याने त्याचा सांगाडा शोधणे अवघड बनले आहे.