पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पश्चिम बंगालमध्ये दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारपासून पुन्हा सुरू होणाऱ्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’दरम्यान समाजकंटक समस्या निर्माण करू शकतील अशी चिंता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केली आहे. खरगे यांनी शनिवारी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून यात्रेच्या तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अन्य सहभागींच्या सुरक्षेसाठी योग्य निर्देश द्यावेत अशी विनंती केली.

काही समाजकंटक राज्याच्या प्रशासनाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करतील किंवा यात्रेमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतील असे खरगे यांनी लिहिले आहे. पश्चिम बंगालमध्ये येण्यापूर्वी शेजारील राज्यामध्ये (आसाम) यात्रेच्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला याचा उल्लेख त्यांनी केला आहे. 

खरगे यांनी लिहिले आहे की, ‘‘मणिपूरमधून महाराष्ट्राकडे निघालेली ‘भारत जोडो न्याय यात्रा’ देशाला एकत्र आणण्यासाठी न्यायाचा संदेश घेऊन निघाली आहे. यापूर्वी काढण्यात आलेल्या कन्याकुमारी ते काश्मीर यात्रेदरम्यान कोणतेही विघ्न आले नव्हते. मात्र, यावेळेस काही समाजकंटक यात्रेला लक्ष्य करत आहेत. पश्चिम बंगालमध्येही असे घडू शकते, त्याचा हेतू राज्य प्रशासनाची प्रतिमा बिघडवणे किंवा यात्रेमध्ये व्यत्यय आणणे यापैकी नक्की कोणता असेल ते मी सांगू शकत नाही’’. ममता बॅनर्जी आणि गांधी कुटुंबीय यांच्यादरम्यानच्या स्नेहपूर्ण संबंधांचा त्यांनी उल्लेख केला आहे.

हेही वाचा >>>‘संविधान निर्मितीमध्ये आंबेडकरांपेक्षा नेहरुंचे श्रेय अधिक’, वाद उफाळल्यानंतर काँग्रेस नेत्याकडून पोस्ट डिलीट

 ही यात्रा पश्चिम बंगालमध्ये पोहोचण्यापूर्वीच काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसदरम्यान वाद वाढला आहे. आधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यानंतर जलपैगुडी येथे राहुल गांधी आणि यात्रेचे पोस्टर फाडण्यात आले असा आरोप काँग्रेसने केला आहे.

यात्रा आजपासून पुन्हा सुरू

यात्रा रविवारी जलपैगुडी जिल्ह्यातून पुढे सुरू होत आहे. कूचबिहार येथे २५ जानेवारीला रोडशो केल्यानंतर राहुल गांधी दोन दिवसांसाठी दिल्लीला परतले. या कालावधीत यात्रेने अलीपूरद्वार येथे तात्पुरता मुक्काम केला. काँग्रेसचे पश्चिम बंगालमधील नेते सुवंकर सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी यात्रा बस आणि पायी अशा दोन्ही मार्गानी पुढे सरकेल. रात्री सिलिगुडीजवळ यात्रेचा मुक्काम असेल. यात्रा सोमवारी दुपारी पश्चिम बंगालमधून बिहारमध्ये प्रवेश करेल आणि ३१ जानेवारीला पुन्हा पश्चिम बंगालमध्ये येईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mallikarjun kharge writes to mamata banerjee requesting security for bharat jodo nyaya yatra amy
First published on: 28-01-2024 at 03:43 IST