काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणी शंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना पातळी सोडली आहे. पंतप्रधान मोदी अतिशय नीच व्यक्ती असल्याचे अय्यर यांनी म्हटले. मोदींकडे किमान सौजन्य नसल्याची टीकाही त्यांनी केली. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन करताना मोदींनी नीच राजकारण केले. या राजकारणाची काय गरज होती?,’ असा प्रश्नही अय्यर यांनी विचारला.

आज दिल्लीत डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी मोदींनी या केंद्राशी जोडलेल्या प्रत्येक विभागाचे अभिनंदन केले. या केंद्राच्या उद्घाटनानंतर उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी काँग्रेसवर नाव न घेता निशाणा साधला. ‘राष्ट्र उभारणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. हे योगदान दुर्लक्षित करण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र, तरीही ज्या कुटुंबाने असे प्रयत्न केले त्यांच्यापेक्षा आंबेडकरांचाच लोकांवर जास्त प्रभाव राहिला,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी काँग्रेसला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले.

मोदींच्या या टीकेला उत्तर देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणीशंकर अय्यर यांची जीभ घसरली. त्यांनी मोदींवर टीका करताना त्यांचा उल्लेख नीच व्यक्ती असा केला. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राच्या उद्घाटनावेळी मोदींना नीच राजकारण करण्याची गरज नव्हती असे अय्यर यांनी म्हटले. ‘हा अतिशय नीच प्रकारचा माणूस आहे. या माणसाकडे जराही सौजन्य नाही. अशा प्रसंगी त्यांना घाणेरडे राजकारण करण्याची काय आवश्यकता होती?,’ असे अय्यर यांनी म्हटले.

डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन करताना मोदींनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर नाव न घेता हल्लाबोल केला. ‘जे राजकीय पक्ष बाबासाहेबांचे नाव घेऊन मतांचा जोगवा मागतात, त्यांना आजकाल बाबासाहेब नव्हे तर बाबा भोले जास्त आठवतात,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी राहुल गांधींना टोला लगावला. ‘आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राची संकल्पना २३ वर्षांपूर्वी मांडण्यात आली होती. मात्र या केंद्राच्या उभारणीकडे मागील सरकारने दुर्लक्ष केले,’ असेही मोदींनी म्हटले.