बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी अवकाश, अणुऊर्जा, कृषी यासारख्या अनेक क्षेत्रांची दारे खुली आहेत. ज्ञान व संशोधनाला जर आपण मर्यादा घातल्या तर देशाच्या क्षमतेचा वापर करण्याच्या दृष्टिकोनातून ते योग्य ठरणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले. अर्थसंकल्पातील शिक्षण क्षेत्रात करण्यात आलेल्या तरतुदींविषयी ते एका वेबिनारमध्ये बोलत होते.

पंतप्रधान म्हणाले, की नवे शैक्षणिक धोरण हे स्थानिक भाषेला प्रोत्साहन देणारे असून आता शिक्षण क्षेत्रातील धुरिणांनी व तज्ज्ञांनी प्रादेशिक भाषात चांगला आशय प्रादेशिक भाषात निर्माण करण्याची जबाबदारी उचलली पाहिजे. तंत्रज्ञानाच्या या जगात हे सगळे शक्य आहे. शिक्षण, कौशल्ये, संशोधन व नवप्रवर्तन या गोष्टींवर भर देण्यात आला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षणाचा संबंध रोजगाराशी जोडला असून उद्यमशील क्षमता निर्माण करण्यातही त्याचा उपयोग होणार आहे.

भारत आज वैज्ञानिक प्रकाशनात जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. ज्ञान व संशोधनाला मर्यादा घालणे म्हणजे देशाच्या क्षमतेवर अन्याय करण्यासारखे आहे. आजच्या काळात अवकाश, अणुऊर्जा, डीआरडीओ, कृषी अशा अनेक क्षेत्रांची दारे बुद्धिमान युवकांसाठी खुली आहेत. स्वयंपूर्ण भारत घडवण्यासाठी युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे.

वन्यजीवांचे संरक्षण करणाऱ्यांचे कौतुक

वन्यजीवांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या लोकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक वन्यजीव दिनाच्या निमित्ताने बुधवारी कौतुक केले. वने आणि प्राण्यांसाठी सुरक्षित निवारास्थळे यांचे संरक्षण करण्यासाठी शक्य ते सर्व केले जायला हवे, असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी वन्यजीवांना वाचवण्यासाठी व त्यांची जोपासना करण्यासाठी, तसेच पृथ्वीवर पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी अधिक जागृती करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. ‘वन्यजीवांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या सर्वाना मी वंदन करतो. विविध प्राण्यांच्या संख्येत नियमित वाढ होत असल्याचे देश बघतो आहे’, असे मोदी यांनी ट्विटरवर लिहिले.