जर तुम्ही स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर 1 एप्रिल म्हणजे आजपासून तुमच्यासाठी काही गोष्टी बदललेल्या असतील. एसबीआयने ग्राहकांसाठी आणलेल्या तीन बदलांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मिनिमम बॅलेन्स –
बॅंक खात्यामध्ये किमान रक्कम(मिनिमम बॅलेन्स) न ठेवल्यास लागणारा 75 टक्के चार्ज कमी केला आहे. त्यामुळे तुम्हाला आधीपेक्षा कमी चार्ज आकारला जाईल. एक एप्रिलपासून हा नियम लागू होणार आहे. सध्या मेट्रो शहरांमधील ग्राहकांना किमान 3 हजार रूपये बॅलेन्स खात्यामध्ये ठेवावा लागतो. त्या खालोखाल 2 हजार रूपये मिनिमम बॅलेन्स आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये 1 हजार मिनिमम बॅलेन्स खात्यामध्ये ठेवावा लागतो.

चेकबुक – स्टेट बॅंक ऑफ इंडियाने काही दिवसांपूर्वी आपल्या सहयोगी बॅंकांच्या ग्राहकांना 31 मार्चपर्यंत आपआपल्या बॅंकेचं चेकबुक बदलून घेण्याची आठवण केली होती. सहयोगी बॅंकांच्या सर्व ग्राहकांनी 31 मार्चपर्यंत नवं चेकबुक मिळवावं असं एसबीआयने सांगितलं होतं. 1 एप्रिलनंतर त्या चेकबुकचा वापर ग्राह्य धरला जाणार नाही. गेल्या वर्षी 5 सहयोगी बॅंकांना एसबीआयमध्ये विलीन करण्यात आलं आहे. एप्रिल 2017 मध्ये स्टेट बॅंक ऑफ बीकानेर अॅंन्ड जयपूर (SBBJ), स्टे बॅंक ऑफ हैद्राबाद( SBH), स्टेट बॅंक ऑफ मैसूर (SBM), स्टेट बॅंक ऑफ पटियाला (SBP), स्टेट बॅंक ऑफ त्रावणकोर (SBT) आणि भारतीय महिला बॅंकेचं एसबीआयमध्ये विलिनीकरण झालं आहे.

इलेक्टोरल बॉन्ड: देशात इलेक्टोरल बॉन्डची विक्री दोन एप्रिलपासून सुरू होणार आहे. स्टेट बॅंकेच्या 11 शाखांमध्ये 9 दिवस ही विक्री सुरू असेल. निवडणूक आयोगानुसार दिल्ली, गुवाहाटी, भोपाळ सारख्या 11 शहरांमध्ये हे बॉन्ड 10 एप्रिलपर्यंत मिळतील. केंद्र सरकारने राजकिय पक्षांना मिळाणा-या देणगीमध्ये पारदर्शकता यावी यासाठी इलेक्टोरल बॉन्डची व्यवस्था केली आहे.