पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बांगलादेशात भव्य स्वागत करण्यात आले. त्यांची बांगलादेशला ही पहिलीच भेट असून दोन्ही देशांतील संबंधांना नवीन आयाम देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मोदी यांचे हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी स्वागत केले. त्यांच्या मंत्रिमंडळातील अर्थमंत्री एएमए मुहिथ, व्यापारमंत्री तोफैल अहमद व कृषिमंत्री मोती चौधरी समवेत होते. मोदी यांना विमानतळावर सलामी देण्यात आली.
राजधानी ढाका मोठमोठय़ा फलकांनी सजली असून त्यावर पंतप्रधान मोदी, ममता बॅनर्जी व शेख हसिना वाजेद यांची छायाचित्रे आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कालच येथे आल्या आहेत.
मोदी यांनी दिल्लीहून निघताना ट्विटवर म्हटले होते, की बांगलादेश दौऱ्यासाठी जात आहे, दोन्ही देशांतील लोकांना फायदा होईल अशा रीतीने संबंध सुधारण्यात आम्ही प्रयत्नशील आहोत.
ईशान्येकडील अतिरेकी बांगलादेशात आश्रय घेतात, हा मुद्दा मांडला जाण्याची शक्यता आहे. मोदी यांनी शेख हसिना वाजेद यांनी दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल अभिनंदन केले आहे.