पश्चिम बंगालच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (CAA) पुन्हा एकदा विरोधकांवर शरसंधान केलं. बेलूर मठात झालेल्या कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, “तुम्ही स्पष्टपणे समजून घेतला आहे. पण, राजकीय खेळ करणारे मुद्दामहून हे समजून घेण्यास टाळाटाळ करत आहेत. सुधारित नागरिकत्व कायद्यावरून लोकांची दिशाभूल करत आहेत,” अशी टीका त्यांनी केली.

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त बेलूर मठात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते. यावेळी मोदी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरून विरोधकांवर टीका केली. “एकविसाव्या शतकात भारताला बदलण्याचा मूळ आधार युवा शक्ती आहे. या युवा पिढीमुळेच नव्या भारताचा संकल्प पूर्ण केला जाणार आहे. समस्यांना टाळू नका, तर त्यांचा सामना करा, त्यांना सोडवा, असं ही युवा पिढी म्हणत आहे. त्यांच्या मनात सुधारित नागरिकत्व कायद्याविषयी काही शंका निर्माण झालेल्या आहेत. त्यांच्या शंकांच निरसन केलं पाहिजे. हा कायदा कुणाचंही नागरिकत्व काढून घेण्यासाठी नाही. तर नागरिकत्व देण्यासाठी आहे. त्या कायद्यात एक सुधारणा केली आहे. पण, राजकीय खेळ खेळणारे लोक मुद्दाम हा कायदा समजून घेण्यास नकार देत आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यावरून लोकांची दिशाभूल करत आहेत,” असा आरोप मोदी यांनी केला.

ममता बॅनर्जी यांची कार्यक्रमाला दांडी –

पंतप्रधान मोदी यांच्या समवेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या कार्यक्रमाला उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी मोदी हा कार्यक्रमाला जाणे टाळले. गेल्या काही दिवसांपासून केंद्र आणि पश्चिम बंगाल सरकारमधील संबंध ताणले गेले आहेत. सुधारित नागरिकत्व कायदा व एनआरसीला ममता यांनी तीव्र विरोध केला आहे. त्यावर ममता अजूनही ठाम असून, त्यामुळेच त्यांनी मोदीसोबत कार्यक्रमाला हजर राहण्याचं टाळल्याचं वृत्त आहे.

कोलकाता पोर्ट ट्रस्टचं नामांतर –

कोलकाता पोर्ट ट्रस्टला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं नेताजी इंदूर मैदानावर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात कोलकाता पोर्ट ट्रस्टचे श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट ट्रस्ट असं नामांतर करण्यात आलं. हा कार्यक्रम पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थित झाला.