गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील प्रचाराची आज सांगता होणार आहे. तत्पूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव रोड शोला प्रशासनाने परवानगी नाकारल्याने मोदींनी प्रचारासाठी हटके पर्याय अवलंबला, त्यासाठी त्यांनी चक्क साबरमती नदीत उतरून धरोई डॅमपर्यंत सी-प्लेनने प्रवास केला. N181KQ या सी-प्लेनने प्रवास करुन येथील अंबाजी मंदिराला ते भेट देणार आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांनी जगन्नाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. भारतातील सी-प्लेनचा हा पहिलाच प्रवास असून पंतप्रधान मोदी सी-प्लेनने प्रवास करणारे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.

मोदींनी सोमवारी एका प्रचार सभेमध्ये या सी-प्लेनच्या प्रवासाची माहिती दिली होती. त्यानुसार त्यांनी आज हा प्रवास केला. मंगळवारी होणाऱ्या मोदी, राहुल गांधी आणि पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांच्या रोड शोला पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारली होती. मोदी आणि राहुल गांधी यांनी ज्या भागात रोड शो साठी परवानगी मागितली होती. तो गर्दीचा भाग असून या दोघांच्या रॅली येथे एकत्र येणार असल्याने त्यामुळे वाद निर्माण होऊ शकला असता त्यामुळे प्रशासनाने त्यांचे हे रोड शो रद्द केले.

दरम्यान, अंबाजी मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी एकवेळी माझ्याप्रमाणेच होते. त्यांनी अंबाजी मातेची भक्ती केल्याने त्यांच्यात हा बदल झाला आहे. पहिल्यांदा ते मुख्यमंत्री होते तेव्हा देखील येथे दर्शनासाठी आले होते. त्यानंतर पंतप्रधानपदाचे स्वप्न पूर्ण झाल्यावरही ते पुन्हा येथे आले आहेत. त्यांच्या इच्छा यापूढेही अशाच पूर्ण होवोत अशी माताजीच्या चरणी प्रार्थना आहे.