आज केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडून विमानामध्ये गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांसाठी आता एक ‘नो फ्लाय लिस्ट’ तयार केली जाणार असल्याचं सांगितलं गेलं. शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यानंतर असे प्रकार घडू नयेत यासाठी एअर इंडिया ही लिस्ट प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तयार करणार आहे. विमानात गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांचं नाव या लिस्टमध्ये समाविष्ट केलं जाऊन त्यांना काही काळ विमानप्रवास करण्यापासून रोखण्यात येणार आहे.

शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी या लिस्टचं स्वागत केलं आहे. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी ही लिस्ट तयार केली जात असल्याने हे एअर इंडियाने उचललेलं स्वागतार्ह पाऊल आहे असं ते म्हणाले. पण ही लिस्ट बनवताना स्थापन करण्यात येणाऱ्या समितीमध्ये संसद सदस्यांनाही स्थान दिलं जावं अशी मागणी त्यांनी केली आहे. पाहा त्यांनी एएनआयला दिलेली प्रतिक्रिया

 

‘नो फ्लाय लिस्ट’ अंतर्गत शिक्षेची वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या प्रकारात आक्षेपार्ह हावभाव, दुसऱ्या प्रकारात ढकलणे, मारणे किंवा लैंगिक छळ यासारखी कृती तर तिसऱ्या प्रकारात जीवे मारण्याचा प्रयत्न यावरून शिक्षा निश्चित केली जाईल. त्यानुसार संबंधित प्रवाशांवर अनुक्रमे तीन महिने, सहा महिने आणि दोन वर्षांसाठी विमानप्रवासासाठी निर्बंध घालण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. बेशिस्त आणि कामकाजात अडथळे निर्माण करणाऱ्या प्रवाशांना जरब बसण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.