बलात्कारविरोधी कायदे सौम्य करण्याची गरज असून मुलांकडून कधीकधी चुका होतात, असे धक्कादायक आणि लज्जास्पद विधान समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी संरक्षण मंत्री मुलायमसिंग यादव यांनी केले. मुलांकडून एखादवेळी झालेल्या अशा चुकीमुळे त्यांना फाशी देणे संयुक्तिक नाही, अशी मल्लिनाथीही त्यांनी केली. मुलायम यांच्या या विधानामुळे देशभरात खळबळ उडाली असून सर्वच पक्षांकडून तसेच देशभरातून या विधानाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाररॅलीत बोलताना ‘मुले ही मुले असतात आणि कधीकधी त्यांच्याकडून चूक होते. त्यासाठी त्यांना फासावर चढविणे योग्य नव्हे’, असे उद्गार मुलायम यांनी काढले. मुंबईतील शक्ती मिल बलात्कारप्रकरणी न्यायालयाने अपराध्यांना ठोठावलेल्या कडक शिक्षेबद्दल त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. बलात्कार करणाऱ्यास मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावणाऱ्या कायद्यात बदल करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा मुलायम यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही यादव यांच्यावर टीका केली. अशा विधानांमुळे पीडित मुलगी व संबंधितांच्या कुटुंबियांवर काय स्थिती ओढावली असेल. मुलायम सिंग सारखे नेते देशात जन्माला आले याची शरम वाटते, असे राज म्हणाले.
काँग्रेस प्रवक्त्या शोभा ओझा यांनी हे वक्तव्य दुर्दैवी असून गुन्हेगारांना प्रोत्साहन देणारे असल्याची टीका केली. सामाजिक कार्यकर्त्यां किरण बेदी यांनी अशा नेत्याला लोकांनीच घरी बसवावे, असे आवाहन केले. सामाजिक कार्यकर्त्यां रंजना कुमारी यांनी निवडणूक आयोगानेच या वक्तव्याची दखल घ्यावी तसेच यादव यांना अटक व्हावी, अशी मागणी केली. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा पूर्णिमा अडवाणी यांनी निवडणूक आयोगाने हा मुद्दा हाती घ्यावा, अशी मागणी केली.