टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क यांचा २३ एप्रिल रोजी भारत दौऱ्याचा नियोजित कार्यक्रम होता. परंतु, हा दौरा एलॉन मस्क यांनी रद्द केला आहे. भारतात गुतंवणूक करण्याच्या उद्देशाने ते भारतात येणार होते. त्यामुळे भारतीय व्यावसायिकांच्याही भुवया उंचावल्या होत्या. परंतु, त्यांचा दौराच रद्द झाल्याने आता गुंतवणूकही लांबली आहे. दरम्यान, ते यावर्षीच्या शेवटपर्यंत भारतात येण्याची शक्यता आहे. परंतु त्यांनी त्यांचा हा नियोजित दौरा का रद्द केला यामागचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे.

जागतिक टाळेबंदी आणि चीनमधील नकारात्मक वाढीदरम्यान टेस्लाचा तिमाही निकाल जाहीर होणार आहे. यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेत प्रमुख समस्यांचं निराकरण त्यांना करावं लागणार आहे, असे वृत्त आघाडीच्या गुंतवणूक फर्म वेडबश सिक्युरिटीजने दिलं आहे.

चीनमधील नकारात्मक वाढ मागे घेण्याची रणनीती; २०२४ साठी उद्दिष्टे आणि आर्थिक दृष्टीकोन; रोबोटॅक्सिस डेव्हलपमेंटसोबत टेस्ला मॉडेल २ लाँच करण्यासाठी वचनबद्ध;  एआय उपक्रम, एआय डे घोषणा आणि धोरण व कमाईची रुपरेषा आदी मुद्द्यांवर या परिषदेत चर्चा होणार आहे. ही परिषद कंपनीच्या इतिहासातील सर्वात महत्वाच्या क्षणांपैकी एक असू शकतो. वेडबश विश्लेषकांनी सांगितले की, अत्यंत स्पर्धात्मक जागतिक ईव्ही बाजारात टेस्लामध्ये बरेच बदल झाले आहे. त्यामुळे या परिषदेत टेस्लाचं भवितव्य ठरणार असल्याचंही म्हटलं जातंय.

हेही वाचा >> टेस्लाची भारतातील गुंतवणूक लांबली, एलॉन मस्क यांनी दौरा पुढे ढकलला! नव्या दौऱ्याबाबत दिले संकेत

एलॉन मस्क भारतात का येणार होते?

एलॉन मस्क २३ एप्रिल रोजी भारतात येणार होते. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन गुंतवणुकीची योजना जाहीर करणार होते. भारत ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी वाहन बाजारपेठ असून त्यात आता टेस्लाचाही सहभा होणार आहे. यासाठी ही भेट नियोजित करण्यात आली होती. टेस्लासाठी अमेरिका आणि चीन या मोठ्या बाजारपेठा आहेत. तेथे विक्री कमी झाल्याने मनुष्यबळात १० टक्के कपात करण्याची घोषणा करण्यात आली आहे. टेस्लाने मुंबई आणि दिल्लीत नवीन दालनांसाठी जागांचा शोध सुरू केला आहे. कंपनीच्या बर्लिनमधील उत्पादन प्रकल्पात उजव्या बाजूला चालक आसन असलेल्या मोटारींचे उत्पादनही सुरू झाले आहे. तिथून भारतात मोटारी निर्यात केल्या जातील.

टेस्लात कर्मचारी कपात

कंपनीने जागतिक स्तरावर आपल्या कर्मचाऱ्यांपैकी १० टक्के म्हणजेच सुमारे १४ हजार कर्मचारी कमी केले आहेत. तसंच, टेस्लाने सुमारे २५ हजार डॉलरमध्ये कमी किमतीची ईव्ही विकसित करण्याची योजना देखील रद्द केली आहे.