काँग्रेसची नव्याने बांधणी करायची असेल पक्षाला नवीन आखणी , नवी दिशा आणि नव्या पद्धतीने प्रचार करायची गरज आहे. अशावेळी राहुल गांधी यांनी निर्णायकपणे काम केले पाहिजे, असे मत काँग्रसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले. ते शुक्रवारी दिल्ली येथे ‘दि इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘आयडिया एक्स्चेंज’ या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी दिग्विजय सिंह यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकांपासून सातत्याने पराभवांचा सामना करावा लागत असलेल्या काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीबद्दल आपले मत मांडले.

माझ्या मते आम्हाला काँग्रेस पक्ष नव्याने बांधण्याची गरज आहे. त्यासाठी आम्हाला काही गोष्टी बदलण्याची गरज आहे. काँग्रेसची नव्याने बांधणी ही झालीच पाहिजे आणि ते काम राहुल गांधी यांच्यापेक्षा कुणीही चांगल्या पद्धतीने करू शकणार नाही. मात्र, राहुल गांधी निर्णायक भूमिका घेऊन काम करत नाहीत, ही माझी त्यांच्याबद्दलची तक्रार आहे. ही गोष्ट मी त्यांना अनेकदा सांगितली आहे. मी सारखा हा धोशा लावत असल्याने ते बऱ्याचदा माझ्यावर चिडतात, असे दिग्विजय सिंह यांनी सांगितले. आम्हाला मध्यमवर्गीयांच्या वाढत्या अपेक्षा डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्षाला कालसुसंगत बनवावे लागेल आणि त्यासाठी पक्षाने नव्या पद्धतीने आखलेली धोरणे अंगिकारली पाहिजेत. हे सर्व काँग्रेसच्या नेतृत्त्वाला म्हणजे राहुल गांधी यांनाच करावे लागेल, असेही दिग्विजय सिंह यांनी जाहीरपणे सांगितले.

याशिवाय, लोकसभेच्या पराभवानंतर काँग्रेस पक्षाने सरचिटणीस ए.के. अँटोनी यांनी सुचविलेल्या बदलांची पक्षाकडून अंमलबजावणी करण्यात आली नाही, हे आरोप दिग्विजय सिंह यांनी फेटाळून लावले. अँटोनी यांचा अहवालावरून निष्कर्ष काढून राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या देश आणि राज्य पातळीवरील तब्बल १५० पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. २८ फेब्रुवारी २०१५ ला हा अहवाल अँटोनी यांनी पक्षश्रेष्ठींकडे दिला होता. याच अहवालाच्या आधारावर काँग्रेसची नव्याने आखणी व्हायला पाहिजे होती. मात्र, दुर्देवाने तसे घडले नाही. केवळ सोनिया आणि राहुल गांधी यांनाच या अहवालाची अंमलबजावणी कधी होणार, याबद्दल माहिती असल्याचे दिग्विजय सिंह यांनी म्हटले.

काँग्रेसकडे नेतृत्त्व नाही किंवा पक्षाला एकसंध ठेवण्यासाठी गांधी घराण्याचीच गरज आहे, अशी कोणतीही समस्या आम्हाला नाही. आमच्याकडे नेतृत्त्व आहे, अनेक नेते आहेत. नेहरू-गांधी हा फॅक्टर नेहमीच पक्षाला बांधून ठेवण्यात निर्णायक ठरला आहे. त्यामुळे नेतृत्त्व ही समस्याच नाही. खरी समस्या काँग्रेसचे पुनरूज्जीवन आणि पुनर्आखणी हीच असल्याचे दिग्विजय यांनी स्पष्ट केले.

नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाविषयी अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. गोव्यामधील काँग्रसेच्या कार्यकर्त्यांमध्येही राहुल यांच्याविषयी नाराजी आहे. गोव्यातील विश्वजीत राणे आणि सॅविओ रॉड्रीक्स यांनी पक्षनेतृत्त्वावर निशाणा साधून राजीनामाही दिला होता. रॉड्रीक्स यांनी तर थेट राहुल गांधी यांना मी नेता मानत नाही, असे विधान केले होते. गोवा विधानसभेत गुरुवारी पार पडलेल्या बहुमत चाचणीवरून त्यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. गोव्यातील काँग्रेसच्या परिस्थितीला आणि झालेल्या पक्षाच्या नुकसानीला ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह जबाबदार आहेत, अशी टीका रॉड्रीक्स यांनी केली होती.