कन्नौज (उत्तर प्रदेश) : जे नमो-नमोचा जयघोष करीत आहेत त्यांचे अस्तित्व लोकसभेच्या या निवडणुकीनंतर संपुष्टात आलेले दिसून येईल, असे बसपाच्या नेत्या मायावती यांनी येथे सांगितले. सपाचे प्रमुख अखिलेश यादव आणि आरएलडीचे अध्यक्ष अजितसिंह यांच्यासह मायावती एका निवडणूक जाहीर सभेत बोलत होत्या.

जे नमो-नमो असा जयघोष करीत आहेत त्यांचे अस्तित्व या निवडणुकीनंतर संपुष्टात येईल आणि जे जय-भीम बोलत आहेत त्यांचा मार्ग खुला होईल, जनतेने भरभरून दिलेला प्रतिसाद पाहता आघाडीच्या उमेदवारांनाच विजयी करण्याचा तुम्ही निर्धार केला आहे हे स्पष्ट होते, असेही मायावती उपस्थितांना उद्देशून म्हणाल्या.

काँग्रेसने मंडल आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी केली नाही याचे मायावती यांनी मतदारांना स्मरण करून दिले. त्याचप्रमाणे काँग्रेस सत्तेवर असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मानही दिला नाही, असे मायावती म्हणाल्या.

काँग्रेसने देशावर आणि उत्तर प्रदेशमध्ये दीर्घकाळ राज्य केले, मात्र गरिबीचे उच्चाटन आणि बेरोजगारी हटविण्यासाठी त्यांनी काहीही केले नाही. इतकेच नव्हे तर काँग्रेसने त्यांच्या राजवटीत दलित, मागासवर्ग आणि अनुसूचित जमाती यांचा कोटा भरला नाही, असेही त्या म्हणाल्या.

सध्या सत्तारूढ असलेल्या भाजपने गरीब, तळागाळातील वर्ग, युवक आणि शेतकऱ्यांना केवळ तोंडी आश्वासने दिली, मात्र त्यांची पूर्तता केली नाही, चौकीदाराचे नाटक आता चालणार नाही, असेही मायावती म्हणाल्या.