संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात मंगळवारी (६ फेब्रुवारी) प्रश्नोत्तराच्या तासावेळी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे एका प्रश्नाचं उत्तर देताना गडबडल्याचं पाहायला मिळालं. खासदार कार्तिकेय शर्मा यांनी नारायण राणे यांना सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या कामगारांविषयी एक प्रश्न विचारला. परंतु, राणे यांनी या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी या विभागांतर्गत होणारी निर्यात कशी वाढवता येईल याबाबत उत्तर देण्यास सुरुवात केली. राणे संसदेत गोंधळल्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सभागृहात खासदार कार्तिकेय शर्मा यांनी नारायण राणे प्रश्न विचारला होता की, एमएसएमई (सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग) सेक्टरमधील कामगारांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने काय पावलं उचलली आहेत? परंतु, या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी नारायण राणे यांनी एमएसएमई सेक्टरमध्ये निर्यात कशी वाढवणार? कारखाने कसे सुरू होणार याबाबतची माहिती वाचून दाखवण्यास सुरुवात केली. राणे म्हणाले, मी तुम्हाला वाचून दाखवतो, निर्यातीच्या क्षेत्रात एमएसएमईची हिस्सेदारी वाढवण्यासाठी, स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी सरकारने मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत व्यवसायाची सुगमता आणि संवर्धनासाठी प्रयत्न केले. तसेच या क्षेत्रातील उपलब्धता वाढवण्यासाठी प्रयत्न केले.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे गडबडल्यानंतर काही खासदारांनी राणे यांना पुन्हा एकदा प्रश्न ऐकवला तर काही खासदार गोंधळ घालू लागले. यावेळी नारायण राणे खासदारांवर संतापल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर पीठासीन अधिकारी हरिवंश यांनी राणे यांना पुन्हा एकदा सांगितलं की, “कामगारांच्या कल्याणासाठी सरकारने काय पावलं उचलली आहेत या प्रश्नाचं उत्तर द्या.” त्यावर नारायण राणे म्हणाले, “मी उत्तर वाचून दाखवतोय. उद्योग चालू झाल्यावर आपोआप अडचणी सोडवल्या जातील. कारखाने बंद राहिले तर या क्षेत्रातील प्रश्न कसे सोडवले जाणार?” यावर खासदार आणखी गोंधळ घालू लागले. राणे यांना प्रश्न नीट समजला नसल्याचं पीठासीन अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं तसेच सभागृहात गोंधळ वाढला. त्यामुळे हरिवंश यांनी राणे यांना सावरलं. ते राणे यांना म्हणाले, तुम्ही सभागृहाचं कामकाज संपल्यावर खासदार कार्तिकेय यांना या प्रश्नाचं उत्तर द्या.

हे ही वाचा >> “महाराष्ट्रात जे झालं, ते काश्मीरमध्ये होऊ नये”, सुप्रिया सुळेंचा जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारला सवाल; म्हणाल्या, “एवढं तर करूच शकता तुम्ही!”

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या घटनेचा व्हिडीओ एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. तसेच त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, नारायण राणे यांना संसदेत प्रश्न विचारला गेला की, MSME क्षेत्रात कामगार कल्याणासाठी काय पावलं उचलणार’. त्यावर त्यांनी काय उत्तर दिलं ते ऐका… ज्यांना प्रश्नदेखील कळत नाही ते MSME ना काय दिशा आणि चालना देणार? राजकारणात नुसती दादागिरी चालत नाही. तसेच बॉसचा वरदहस्तदेखील फार काळ चालत नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane gets confused in parliament on question related to msme sector anjali damania criticized asc
First published on: 06-02-2024 at 16:03 IST