मॉस्कोमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल ११५ लोकांचा मृत्यू झाला असून १४५ पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्यामुळे मॉस्को शहर हादरले आहे. मॉस्कोच्या एका कॉन्सर्ट हॉलमध्ये हजारो लोक एकत्र जमले असतांनी हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट ग्रुपने घेतली आहे. मॉस्कोतील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत भारत रशियाच्या पाठिशी उभा असल्याचे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय म्हटले?

“मॉस्कोमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. आमचे विचार आणि प्रार्थना पीडितांच्या कुटुंबियांसोबत आहेत. या दु:खाच्या काळात भारत सरकार रशियन लोकांच्या पाठीशी एकजुटीने उभे आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

आणखी ६० जणांची प्रकृती गंभीर

रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोच्या एका हॉलमध्ये पाच ते सहा जणांनी गोळीबार केला. यामध्ये ११५ जण ठार झाले. जवळपास १४५ लोकांची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांपैकी आणखी ६० जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा : रशियात भीषण दहशतवादी हल्ला; बॉम्बस्फोटात ६० ठार तर १४५ जखमी; इस्लामिक स्टेट ग्रुपनं घेतली हल्ल्याची जबाबदारी!

युक्रेनकडून स्पष्टीकरण

मॉस्को शहरात झालेल्या या हल्ल्यात युक्रेनचा हात असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, युक्रेनने आता याबाबत स्पष्टीकरण देत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर युक्रेनला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचे युक्रेनने म्हटले आहे. दरम्यान, रशियाच्या तपास यंत्रणांकडून या दहशतवादी हल्ल्याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi on terrorist attack in the capital of russia moscow marathi news gkt
Show comments