देशाला देवालयांऐवजी शौचालयांची अधिक गरज आहे असे सांगत हिंदुत्वाची झूल खाली ठेवण्याचे संकेत देणारे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील आपल्या पहिल्यावहिल्या प्रचारसभेत राम मंदिराचा उल्लेख कटाक्षाने टाळत पुन्हा एकदा धर्मनिरपेक्षतेचेच गोडवे गायले. रामनामाऐवजी त्यांनी राष्ट्रनामाचा जप केला. राष्ट्र हा सरकारचा धर्म असतो तर राज्यघटना हा धार्मिक ग्रंथ असतो असे मोदी यांनी स्पष्ट केले.
नरेंद्र मोदी यांची शनिवारी कानपूरमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. ऑक्टोबरच्या कडक उन्हाच्या तडाख्यातही हजारोंच्या संख्येने लोकांनी सभास्थानी गर्दी केली होती. मोदी सभेत राम मंदिराचा उल्लेख करतील अशी अटकळ होती. मात्र, मोदी यांनी आल्याआल्याच भाषणाचा रोख धर्मनिरपेक्षतेकडेच ठेवला. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी सरकारच्या धर्माविषयी भाष्य केले. ‘शासनाला एकच धर्म असतो आणि तो म्हणजे राष्ट्र सर्वप्रथम, भारत सर्वप्रथम! त्यांना एकच धार्मिक ग्रंथ असतो, तो म्हणजे राज्यघटना,’ असे सांगताच जनसागराने त्यांना टाळ्यांच्या कडकडाटाने प्रतिसाद दिला. काँग्रेस केवळ निवडणुका जिंकण्यासाठी ‘धर्मनिरपेक्षते’चा मंत्र जपते आणि प्रत्यक्षात लोकांमध्ये दुही पसरविण्याचे काम करते, भाजप मात्र जनतेला एकसंध ठेवण्यास कटिबद्ध आहे, असे सांगत मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसपेक्षा भाजपच धर्मनिरपेक्ष असल्याचा दावा केला़  ‘हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध आदी कोणत्याही धर्माचे लोक ‘सुखात’ राहावेत, हेच आमच्या पक्षाचे ध्येय आह़े आम्ही मतपेटय़ांच्या राजकारणाला कायमची मूठमाती दिली आह़े आम्हाला विकासाकडे नेणारे राजकारण करायचे आहे,’ असे सांगत मोदींनी पक्षाची हिंदुत्ववादी प्रतिमाही झाकण्याचा प्रयत्न केला़
मुझफ्फरनगरचा उल्लेखही नाही
विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगर जिल्ह्य़ात अलीकडेच झालेल्या दंगलीचा उल्लेखही मोदींनी या भाषणात टाळला. मात्र, त्याचा धागा पकडून उत्तर प्रदेश सरकारवर कठोर टीकाही केली. उत्तर प्रदेशात वर्षभरात विविध कारणांमुळे पाच हजार जणांचा बळी गेल्याचे ते म्हणाले.