पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे की, “विरोधकांनी शिव्या दिल्याने मला काहीच फरक पडत नाही. या लोकांना (विरोधकांना) वाटतं की, केवळ त्यांनाच शिव्या देण्याचा अधिकार आहे. मात्र मी आता त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो.” एनएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला. मोदी म्हणाले, “इंडिया आघाडीवाल्या लोकांनी जिथे त्यांची सत्ता आली तिथे रातोरात दरोडा टाकून ओबीसींचं आरक्षण हिरावलं. या लोकांनी मुस्लिम समाजातील विविध जातींचा ओबीसीत समावेश केला आणि ओबीसींचं आरक्षण त्यांना लागू केलं. त्यांनी दरोडा टाकून ओबीसींचे अधिकार हिसकावले.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “या लोकांनी ओबीसींचं आरक्षण हिरावलं आहे, याविरोधात आम्ही निवडणूक काळात आवाज उठवला. कर्नाटकमध्ये त्यांनी जे काही केलंय, पश्चिम बंगालमध्ये त्यांनी ज्या प्रकारे ओबीसींच्या आरक्षणावर घाला घातला, त्याविरोधात आम्ही आवाज उठवला. दरम्यान, यावर कोलकाता उच्च न्यायालयाचा निकाल आला तेव्हा स्पष्ट झालं की, या लोकांनी दगाबाजी केली होती. केवळ व्होट बँकेचं राजकारण करण्यासाठी त्यांनी ओबीसींचे अधिकार हिरावले. याप्रकरणी न्यायालयाच्या निकालानंतर हे लोक (विरोधक) न्यायपालिकेला शिव्या देऊ लागले. काहीही झालं तरी आम्ही न्यायालयाचा आदेश मानणार नाही, अशी भूमिका घेतली. मात्र आम्ही या असल्या गोष्टी सहन करणार नाही.”

दरम्यान, दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे जामिनावर बाहेर आले असून त्यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, मोदींनी मला आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात डांबलं. या कारवाया मोदींच्या इशाऱ्यानेच होतात. केजरीवालांच्या या आरोपांवर मोदी यांनी उत्तर दिलं. मोदी म्हणाले, “या लोकांनी माझ्यावर टीका आणि आरोप करण्यापेक्षा संविधान वाचावं, देशातील कायदे वाचावे.”

हे ही वाचा >> शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करणार? शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले, “तो श्लोक अतिशय चांगला…”

दरम्यान, मोदी यांना यावेळी विचारण्यात आलं की, “यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विरोधक आणि सत्ताधारी पक्षांमधील नेत्यांनी एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर टीका केली. त्याबद्दल काय सांगाल?” यावर उत्तर देताना मोदी म्हणाले, “तुम्ही जर माझ्याबद्दल बोलत असाल तर मी इतकंच सांगेन की, मी गेल्या २४ वर्षांपासून शिव्या खाऊन, खाऊन ‘गाली प्रूफ’ (शिव्यांनी काही फरक पडत नाही) झालोय. काही जण मला ‘मौत का सौदागर’ म्हणायचे, ‘गंदी नाली का किडा’ म्हणायचे. एकदा संसदेत मला इतक्या शिव्या दिल्या गेल्या की, माझे एक मित्र शिव्या मोजत होते. तेव्हा मला १०१ शिव्या दिल्या होत्या. निवडणूक असो अथवा नसो, या लोकांना (विरोधकांना) असं वाटतं की, शिव्या देण्याचा अधिकार केवळ त्यांनाच आहे. ते लोक इतके हताश आणि निराश झालेत की शिव्या देणं, अपशब्द वापरणं हा त्यांच्या स्वभावाचा भाग झाला आहे.”