पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वृत्तवाहिन्या आणि वृत्तसंस्थांना मुलाखीत देत आहेत. अशाच एका मुलाखतीत त्यांनी देशातील भ्रष्टाचार, मनी लॉन्डरिंगची प्रकरणं आणि त्याविरोधात अंमलबजावणी संचालनालय (ईडी), केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभाग (सीबीआय), आयकर विभागासह (आयटी) इतर केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणाऱ्या कारवाईवर, तसेच त्या कारवाईनंतर केंद्र सरकारवर होणाऱ्या टीकेवर रोखठोक मतं मांडली. पंतप्रधान मोदी म्हणाले, “पूर्वी देशात चर्चा केली जायची की कितीही भ्रष्टाचार केला तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही. केवळ लहान-मोठ्या लोकांवरच कारवाई होते, मोठे मासे कधी गळाला लागत नाहीत. आम्ही मात्र भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कडक कारवाई करत आहोत, भ्रष्टाचार करणारे मोठे मासे केंद्रीय तपास यंत्रणांच्या गळाला लागत आहेत तर आता म्हटलं जातंय की अमुक-तमुक लोकांवर कारवाई का करताय? मला कळत नाही की या लोकांना नेमकं काय हवं आहे.”

पंतप्रधान म्हणाले, “भ्रष्टाचाराविरोधातील कारवाईवरून प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना माझं एकच सांगणं आहे की, भ्रष्टाचाऱ्यांविरोधात देशात जी कारवाई चालू आहे ती स्वतंत्र केंद्रीय तपास यंत्रणा करत आहेत. यात आमची काहीच भूमिका नाही. झिरो टॉलरन्स हेच आमचं धोरण आहे. तसेच तथ्य आणि पुराव्यांच्या आधारावर कारवाई करायला हवी.” पंतप्रधान मोदी आयएएनएसशी बोलत होते.

पंतप्रधान म्हणाले, “भ्रष्टाचारातील मोठे मासे केंद्रीय तपास यंत्रणांच्या गळाला लागले तर काहीजण आम्हाला विचारू लागले आहेत की या लोकांना का पकडताय? मला कधी कधी कळत नाही की ही कुठली खान मार्केट गँग आहे जी काही ठराविक लोकांना वाचवू पाहतेय. अशी कोणती टोळी आहे जी आपल्याच देशाविरोधात जनमत तयार करू पाहतेय. आपलं प्रशासन ईमानदारीने काम करतंय तर काही लोक उगाच आरडाओरड करू लागले आहेत.”

मोदी म्हणाले, “भ्रष्टाचार करणारे मोठे मासे आता पकडले जातायत तर काहीजण उगाच विरोध करत आहेत. मला त्यांना सांगायचं आहे की मनी लॉन्डरिंग, भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कारवाई करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या स्वतंत्रपणे काम करत आहेत. तसेच त्या आरोपींना किंवा गुन्हेगारांना तुरुंगात ठेवायचं किंवा नाही ठेवायचं, त्यांच्यावरील खटला योग्य आहे किंवा अयोग्य आहे? याचा निर्णय न्यायालय करतं. आपलं न्यायालय त्यांच्यावर कारवाई करतं, शिक्षा सुनावतं, जामीन देतं. त्यामध्ये मोदीची कोणतीही भूमिका नाही किंवा सरकारचाही त्यात कुठल्याही प्रकारचा सहभाग नसतो.”

हे ही वाचा >> “…म्हणून २००४ मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला नाही”, सुधाकरराव नाईकांचा उल्लेख करत अजितदादांनी सांगितली पवारांची भीती

नरेंद्र मोदी म्हणाले, यासह देशासमोर आणखी एक चिंतेचा विषय आहे. देशात सध्या भ्रष्ट लोकांचं महिमामंडन केलं जातंय. पूर्वी भ्रष्टाचाराच्या आरोपात कोणाला पकडलं जायचं नाही. त्याबद्दल जनता नेहमी तक्रार करत असायची. आता भ्रष्टाचाऱ्यांना पकडलं जातंय, त्यांच्यावर कारवाई केली जातेय. तर काही ठराविक लोक उगाच गळा काढत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या देशातील प्रसारमाध्यमांनी मोठ्या जबाबदारीने एक काम पूर्ण करायला हवं. त्यांनी जनतेला जाऊन विचारायला हवं की भ्रष्टाचारातील लहान मासे पकडायला हवेत की मोठ्या माशांना पकडून तुरुंगात टाकायला हवं? याबाबत जनतेचं मत काय आहे ते प्रसारमाध्यमांनी तपासायला हवं. किंवा केंद्रीय तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईची योग्य माहिती जनतेपर्यंत पोहोचवून जनमत तयार करायला हवं.