राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल काश्मीर खोऱ्यात दहा दिवस राहिल्यानंतर शुक्रवारी दिल्लीला परतले आहेत. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढण्यात आल्यानंतर डोवाल यांना तेथील परिस्थितीचा अंदाज घेऊन देशविरोधी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी व लोकांमधील भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी काश्मीर खोऱ्यात पाठवले होते.


अजित डोवाल ६ ऑगस्ट रोजी काश्मीरमध्ये दाखल झाले होते. यानंतर त्यांनी येथील परिस्थितीचा आढावा घेत, जनजीवन सामान्य करण्याच्यादृष्टीने काम केले. कुठल्याही देशविरोधी घटनेमुळे येथील नागरिकांना इजा पोहचता कामा नये, ही त्यांच्यावर विशेष जबाबदारी होती. त्यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान शोपिया आणि तेथील आसपासच्या परिसरातील स्थानिक जवानांशी संवाद साधला. दहशतवादी कारवाया घडण्यामध्ये शोपिया जिल्हा सर्वात अग्रस्थानी आहे.

डोवाल यांनी काश्मीरमधील स्थानिकांबरोबर जेवण देखील केले होते. तसेच, त्यांनी जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि सैन्यदलाच्या जवानांनाही मार्गदर्शन केले.