केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास आता २५ दिवसांपेक्षाही जास्त दिवस झाले आहेत. मात्र, अद्यापही यावर तोडगा निघालेला नसल्याने हे आंदोलन सुरूच आहे. दरम्यान हे आंदोलन करत असताना मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना आज(रविवार) शेतकरी संघटनांकडून श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. आतापर्यंत या आंदोलनात जवळपास ३० शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे.

शेतकरी संघटनांनी या देशव्यापी श्रद्धांजली सभांच्या पार्श्वभूमीवर आपसात चर्चा करून त्यानुसार नियोजन केले आहे. शेतकरी नेत्यांचे म्हणने आहे की, शेती-शेतकरी वाचवण्यासाठी जवळपास ३० शेतकऱ्यांनी आपला जीव दिला आहे. त्यांच्या स्मरणार्थ होणाऱ्या सभांमुळे देशभरातील प्रत्येक गावातील शेतकरी या आंदोलनाशी जोडला जाईल.

शेतकरी नेते गुरनाम सिंह चढूनी यांनी सांगितेल की, आज (रविवार) देशातील सर्व जिल्हे, तहसील व गावांमध्ये श्रद्धांजली सभा होतील. यामध्ये आंदोलन करतेवेळी जीव गमावलेल्या शेतकऱ्यांचे स्मरण केले जाईल. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत या श्रद्धांजली सभा पार पडतील.

संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने या श्रद्धांजली सभांसाठी एक पोस्टर देखील काढण्यात आले आहे. यामध्ये आंदोलन करताना मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांचे फोटो लावण्यात आले असून, विविध माध्यमांद्वारे ते सर्वत्र पाठवले जात आहेत.

याशिवाय सिंधु, टीकरी व गाजीपूर बॉर्डरवरील आंदोलन ठिकाणांवर सभा होणार आहेत. मुख्य आयोजन हे सिंघु बॉर्डरवर असणार आहे. या ठिकाणी सर्व शेतकरी संघटनांचे नेते उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी आंदोलन करताना मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल व त्यानंतर आंदोलनाबाबत चर्चा केली जाणार आहे.