चंदिगढ/अमृतसर : पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घेतल्याचे पंजाबचे मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी समर्थन केले आहे. कोणी यजमान पाहुण्यांची गळाभेट घेत असेल तर तो गुन्हा नाही, असे सिद्धू यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ इम्रान खान यांनी घेतली त्याला सिद्धू यांना निमंत्रण देण्यात आले होते. या शपथविधीच्या वेळी सिद्धू यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांची गळाभेट घेतली त्यावरून वाद निर्माण झाला. त्यावर स्पष्टीकरण देताना सिद्धू यांनी या गळाभेटीचे समर्थन केले. बाजवा यांनी आपल्याशी संवाद साधला, पाकिस्तानमधील गुरूनानक गुरुद्वाराला ५५० वर्षे पूर्ण होत असल्याने करतारपूर मार्ग खुला करणार असल्याचे बाजवा यांनी आपल्याला सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी मान्य झाल्याने आपण उत्साहाने बाजवा यांची गळाभेट घेतली, असे सिद्धू म्हणाले.

पाकिस्तान भेटीत तेथील लोकांनी प्रेम दिले, इम्रान यांना आपण भारतीयांच्या भावना सांगितल्या, पाकिस्तानसमवेत भारताचे संबंध अधिक चांगले होतील, असा विश्वास सिद्धू यांनी व्यक्त केला.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी सिद्धू यांच्या गळाभेटीवर नाराजी व्यक्त केली होती, मात्र सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी फेटाळून लावली. हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करणार असल्याचे भाजपने म्हटले आहे.