माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. एपीजे अब्दुल कलाम नवी दिल्लीमध्ये ज्या निवासस्थानी राहात होते, ते आता केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांना देण्यात आल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या या निर्णयावर आम आदमी पक्षाने जोरदार टीका केली. डॉ. कलाम यांना श्रद्धांजली म्हणून हे निवासस्थान केंद्र सरकारने ज्ञान केंद्र म्हणून विकसित करायला हवे होते, अशी मागणी आपने केली आहे.
राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यावर डॉ. कलाम हे दिल्लीतील प्रसिद्ध ल्युटन्स झोनमधील १०, राजाजी मार्ग येथील निवासस्थानी राहात होते. त्यांच्या निधनानंतर हे निवासस्थान महेश शर्मा यांना देण्याचा निर्णय नगरविकास मंत्रालयाने घेतला. याबाबत महेश शर्मा म्हणाले, नगरविकास मंत्रालयाने १०, राजाजी मार्ग हे निवासस्थान मला देण्याबद्दल विचारणा केली होती. मी त्यांना होकार कळवला आहे. ल्यूटन्स झोनमधील कोणताही बंगला स्मृतीस्थळ म्हणून विकसित न करण्याचे सरकारचे धोरण आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
राष्ट्रीय लोकदलाचे नेते अजित सिंग यांनी तुघलक रस्त्यावर त्यांचे वडील चरणसिंग राहात असलेले निवासस्थान स्मृतीस्थळ म्हणून विकसित करण्याची मागणी केली होती. मात्र, ती सुद्धा सरकारने फेटाळली होती, असे महेश शर्मा म्हणाले.