गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या पक्षातील अनेक मोठमोठे नेते भाजपात गेले आहेत. अनेक पक्ष फुटले आणि तयार झालेले नवे गट भाजपाबरोबर सत्तेत बसले आहेत. दरम्यान, पक्षांतर करणाऱ्या आणि संधीसाधू नेत्यांबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काही संधीसाधू नेते मूळ विचारांशी तडजोड करून सातत्याने सत्ताधारी पक्षाबरोबर राहण्याचा प्रयत्न करत असतात, याबाबत गडकरी यांनी चिंता व्यक्त केली. गडकरी म्हणाले, मूळ विचारसरणी सोडणं, विचारसरणीचा दर्जा घसरणं हे लोकशाहीसाठी चांगलं नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडकरी म्हणाले, “निष्ठावान नेते किंवा स्वतःच्या मूळ विचारसरणीवर ठाम असणाऱ्या नेत्यांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे.” दरम्यान, नितीन गडकरी यावेळी कोणाचंही नाव न घेता म्हणाले, मी नेहमी गंमतीने म्हणतो की, सत्तेत कोणताही पक्ष असो, एक गोष्ट मात्र कायम असते, ती म्हणजे चांगलं काम करणाऱ्याला कधीच सन्मान मिळत नाही आणि वाईट काम करणाऱ्याला कधीच शिक्षा होत नाही.

नितीन गडकरी यांनी मंगळवारी (६ फेब्रुवरी) एका वृत्तसमूहाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांचा गडकरींच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमावेळी गडकरी म्हणाले, आमच्यातील मतभेद आणि वादविवाद ही आमची समस्या नाही. काही लोकांकडे विचारच नाहीत ही मोठी अडचण आहे. काही नेते आहेत जे त्यांच्या मूळ विचारसरणीसह उभे आहेत. त्यांचा दृढनिश्चय सातत्याने दिसून येतो. ते त्यांच्या विचारांची प्रतारणा करत नाहीत. परंतु, या नेत्यांची संख्या खूप कमी आहे. ही गोष्ट लोकशाहीसाठी चांगली नाही.

केंद्रीय मंत्री म्हणाले, राजकारणात सध्या असे काही लोक आहेत जे ना डावे आहेत ना उजवे, ते केवळ संधीसाधू आहेत. हे लोक या ना त्या मार्गाने सत्ताधारी पक्षाशी ताळमेळ राखून असतात. आपल्याला नेहमी सत्ताधारी पक्षाबरोबर कसं राहता येईल याची काळजी घेतात.

हे ही वाचा >> “धमक होती तर काढा ना स्वतःचा पक्ष, कुणी अडवलं होतं?” अजित पवारांचं ‘ते’ भाषण शेअर करत मनसेचा हल्लाबोल

नितीन गडकरी यांनी यापूर्वीदेखील स्वपक्षातील नेत्यांसह इतर पक्षांमधील लोकप्रतिनिधींबाबत भाष्य केलं आहे. ‘जो जातीची गोष्ट करणार, त्याला लाथ पडणार’, अशा कठोर शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीवादावर भाष्य केलं होतं. गांधीवादी विचारक रघू ठाकूर यांच्या ‘गांधी- आंबेडकर कितने दूर कितने पास’ या पुस्तकाच्या लोकार्पणावेळी गडकरींनी पुढाऱ्यांवर टीका केली होती. गडकरी म्हणाले, महाराष्ट्रात विविध जातींची आंदोलने होत आहेत. त्यापैकी बरीच शिष्टमंडळं मला येऊन भेटतात. मी कधीही जात- पात मानली नाही. त्यामुळे या चुकीच्या राजकारणातून समाज व देशाचा विकास शक्य नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari says leaders who works never gets respect on deteriorating ideology asc
First published on: 07-02-2024 at 12:16 IST