चेन ओढून रेल्वे थांबवण्याची व्यवस्था बंद केली जाणार नसून केवळ त्याच्या गैरवापराबाबत जनजागृती केली जाईल, असे रेल्वे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. रेल्वेच्याच काही अधिकाऱ्यांनी रेल्वे गाडय़ांमधील चेन काढून टाकणार असल्याची माहिती दिली होती. या साखळ्या काढून टाकण्याचे काम बरेली येथील रेल्वे निगा केंद्रात सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. रेल्वे प्रवक्त्याने आज सांगितले की, रेल्वेच्या साखळ्या ओढून ती थांबवण्याचे गैरप्रकार होत असले तरी  साखळ्या काढण्याचा विचार नाही. रेल्वेच्या साखळ्या ओढून ती थांबवण्याचे प्रकार उत्तर प्रदेश, बिहार या राज्यात मोठय़ा प्रमाणावर चालतात व गाडय़ा वेळेत न पोहोचल्याने मोठे आर्थिक नुकसान होते.