नोबेल हा जगातला मानाचा पुरस्कार समजला जातो यात कोणतीही शंकाच नाही. मात्र साहित्य क्षेत्रातील नोबेल दिला जाणार की नाही याचा निर्णय शुक्रवारी होणार आहे. स्वीडिश अॅकॅडमी याबाबतचा निर्णय शुक्रवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट करणार आहे असे सांगण्यात आले आहे. अॅकॅडमीचे प्रशासकीय संचालक लुई हेडबर्ग यांनी ही माहिती स्वीडिश रेडिओशी बोलताना दिली. या संदर्भात कोणतीही पत्रकार परिषद होणार नाही. जो निर्णय असेल तो प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसारमाध्यमांना पाठवण्यात येईल असेही हेडबर्ग यांनी स्पष्ट केले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
स्वीडिश अॅकॅडमीच्या एका सदस्याच्या पतीवर बलात्कार आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. यामुळे अॅकॅडमीबाबत वाद निर्माण झाला होता. याच कारणामुळे साहित्यातील नोबेल द्यायचे की नाही याचा निर्णय अधांतरी आहे. या स्कँडलमुळे अॅकॅडमीची बदनामी झाली आहे. #MeToo या मोहिमे अंतर्गत नोव्हेंबर महिन्यात १८ महिलांनी अॅकॅडमीच्या सदस्य कॅटरिना फ्रॉसटेंशन यांचे पती क्लॉइड अर्नाल्ट यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. अर्नाल्ट यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत. मात्र या संदर्भात अॅकॅडमीत दोन गट पडले आणि हा वाद वाढत गेला. या वादानंतर एकूण १८ सदस्यांपैकी ७ जणांनी राजीनामा दिला.

अॅकॅडमीच्या सदस्यांची नियुक्ती कायमस्वरूपी केलेली असते. ते राजीनामा देऊ शकत नाहीत. तरीही या सदस्यांनी तो दिला आहे. तसेच अॅकॅडमीच्या नियमावलीनुसार नोबेल पुरस्कार देण्यासाठी एकूण १२ सदस्यांची आवश्यकता असते. १८ पैकी १२ जणांनी एका साहित्यिकाच्या नावावर पुरस्कार देण्यास सहमती दर्शवली तर तो पुरस्कार त्या व्यक्तीला दिला जातो. मात्र सध्या ही सदस्य संख्याही अपुरी आहे. त्याचमुळे साहित्यातील नोबेल पुरस्कार दिला जाणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. १९०१ पासून नोबेल पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर १९१४, १९१८, १९३५, १९४०, १९४१, १९४२ आणि १९४३ अशा एकूण सात वर्षी साहित्यातील नोबेल देण्यात आलेले नाही.