नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचे सुतोवाच डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी दिले. त्यावर डेमोक्रॅटिक पक्षाने जोरदार टीका केली.

करोना संकटामुळे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी केंद्रांवर रांगेत उभे राहण्यापेक्षा मोठय़ा प्रमाणात मतदार टपाली मतदानाचा पर्याय स्वीकारण्याची शक्यता आहे. मात्र, निवडणुकीत टपाली मतदानात गैरप्रकार होईल, अशी भीती व्यक्त करत डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुका लांबणीवर टाकण्याबाबत ट्वीट केले. टपाली मतदानामुळे २०२० हे अध्यक्षीय निवडणुकीच्या इतिहासात गैरप्रकाराचे वर्ष ठरेल. त्यातून अमेरिकेची मोठी अडचणी होईल. त्यामुळे नागरिकांना योग्य रीतीने व सुरक्षितपणे मतदान करता यावे, यासाठी निवडणुका लांबणीवर टाकाव्यात का?, असे ट्वीट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. त्यानंतर डेमोक्रॅटिक पक्षासह रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी ट्रम्प यांना लक्ष्य केले. निवडणुका लांबणीवर टाकण्याची शक्यता नसल्याचे डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले.