जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान काकापुरा येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर जवानांनी दहशतवाद्यांना घेरले. त्याठिकाणी अद्यापही दोन दहशतवादी दडून बसल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस आणि जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे.

भारतीय लष्कराने सप्टेंबरमध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी अड्ड्यांवर सर्जिकल स्ट्राइक केला होता. त्यानंतर पाकिस्तान आणि दहशतवादी संघटना अस्वस्थ झाल्या आहेत. पाकिस्तानच्या सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसखोरी करता यावी, यासाठी पाकिस्तानच्या सैन्याकडून मदत केली जात आहे. पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय सैन्यांच्या चौक्यांच्या दिशेने उखळी तोफांचा मारा करण्यात येत आहे. शनिवारीही पाकिस्तानने ६ तासांमध्ये दोनदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टर आणि नियंत्रण रेषेनजीक भारतीय चौक्यांवर पाकिस्तानकडून उखळी तोफांचा मारा करण्यात आला. तसेच गोळीबारही करण्यात आला.

पाकिस्तानी सैन्याने सकाळी साडेदहा वाजता नौशेरा सेक्टरमध्ये उखळी तोफांचा मारा आणि गोळीबार केला. पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिला जात आहे. गोळीबारात आतापर्यंत कोणतीही हानी झाली नाही. दोन्ही बाजुंनी गोळीबार सुरू आहे, असे लष्कराच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.