कर्नाटक काँग्रेसचे वरिष्ठ आमदार आणि मंत्र्यांनी भर सभेत आपल्या सरकारच्या निर्णयाला चुकीचे ठरवत उपस्थितांची माफी मागितली आहे. जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार यांनी पहिल्यांदा सार्वजनिकरित्या माफीनामा सादर केला. ते म्हणाले, पक्षाने राज्यात विधानसभा निवडणुकांच्यावेळी लिंगायत समुदायाबाबत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करायला नको होता.

कर्नाटकातील गडक येथील रामभापुरी सेर वीरा सोमेश्वर शिवचार्य स्वामींच्या दसरा संमेलनात ते बोलत होते. शिवकुमार म्हणाले, आमच्या (काँग्रेस) पक्षाने राज्यात मोठी चूक केली. ही चूक मी नाकारणार नाही. मला असे वाटते की कोणत्याही सरकारने जाती आणि धर्माशी निगडीत प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करायला नको. लिंगायतांना स्वतंत्र धर्माच्या दर्जाबाबत आमच्या पक्षाने दिलेला पाठींबा योग्य नव्हता.

अनेक मंत्री आणि नेत्यांनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे. मात्र, निवडणुकीत जनतेद्वारा देण्यात आलेला जनादेश या गोष्टीचा पुरावा आहे की, सरकारांना या बाबतीत हस्तक्षेप करायला नको होता. जर आमच्या सरकारने चूक केली असेल तर मी आपली माफी मागतो, असे शिवकुमार यांनी जाहिररीत्या म्हटले आहे.

लिंगायत समुदायाला धार्मिक अल्पसंख्यांक समुहाची मान्यता द्यायला वीरा सोमेश्वर यांनी जोरदार विरोध केला होता. वीरा सोमेश्वर गडक येथील प्रभावशाली लिंगायत समुदायाचे धर्मगुरु आहेत. कर्नाटकातील उत्तर भागात लिंगायत समाजाची मोठी संख्या आहे.