काश्मीर मुद्दय़ावरून भारताशी चौथे युद्ध करण्याची भाषा पाकिस्तानच्या अंगाशी आली आहे. पाकिस्तानच्या आक्रस्ताळ्या भूमिकेला भारताच्या पंतप्रधानांनी जशास तसे उत्तर दिल्याने वरमलेल्या पाकिस्तानने आता पुन्हा चर्चेचा सूर आळवला आहे. काश्मीर मुद्दा हा चर्चेच्या माध्यमातून शांततेने सोडवणे गरजेचे असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते एजाज चौधरी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन काश्मीर मुद्दय़ाबाबत पाकिस्तानची भूमिका स्पष्ट केली. काश्मीर मुद्दा हा चर्चेनेच सोडविण्यावर आमचा भर असून आम्ही भारत सरकारकडे याबाबत वारंवार पाठपुरावा केला आहे. ही चर्चा सकारात्मक आणि अर्थपूर्ण व्हावी अशी आमची इच्छा असून काश्मीरमधील नेत्यांनाही याबाबत विश्वासात घ्यावे, असे चौधरी म्हणाले.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये आयोजित केलेल्या एका जाहीर कार्यक्रमात काश्मीर मुद्दय़ावर भारताशी चौथे युद्ध होण्याची शक्यता वर्तविल्याचे वृत्त डॉनमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांची गंभीर दखल घेत आपल्या हयातीत पाकिस्तान भारताबरोबर कोणतेही युद्ध जिंकू शकत नाही, असे जशास तसे प्रत्युत्तर दिले होते. या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानने गुरुवारी तातडीने पत्रकार परिषद घेऊन सारवासारव केली.
याबाबत चौधरी यांना विचारले असता ते म्हणाले की, स्वतंत्र काश्मीर ही आमची भूमिका आहे. त्याबाबत आमची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे. शिवाय काश्मीर मुद्दय़ावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यावर पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा भर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.