भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करुन त्यानंतर भारतालाच वातावरण न बिघडवण्याचा सल्ला देणाऱ्या पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरमधील परिस्थिती चिघळवण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरु आहेत. जम्मू काश्मीरमधील घरांमध्ये दिसणाऱ्या अनेक सौदी आणि पाकिस्तानी वाहिन्यांवरुन ‘आझादी’चा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित केला जातो आहे. पन्नासपेक्षा अधिक पाकिस्तानी आणि सौदी वाहिन्या भारतविरोधी प्रचार करत असल्याने जम्मू काश्मीरमधील वातावरण अधिक बिघडत आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

सौदी मौलवी आणि पाकिस्तानच्या वृत्तवाहिन्यांचे सूत्रसंचालक प्रक्षोभक भाषेचा वापर करुन काश्मीरमधील परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे काश्मीरमध्ये प्रसारित होणाऱ्या अनेक वाहिन्या खासगी केबल नेटवर्कच्या माध्यमातून दाखवल्या जात आहेत. यामध्ये झाकिर नाईकच्या पीस टीव्ही प्लसचादेखील समावेश आहे. विशेष म्हणजे काश्मीरमधील अनेक केबल ऑपरेटर्स कोणत्याही परवानगीशिवाय सौदी आणि पाकिस्तानमधील वाहिन्या दाखवत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे भाजप आणि पीडीपी सरकारच्या अनेक कार्यालयांमधील खासगी केबल ऑपरेटर्सचे कनेक्शन आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांमधील टिव्हीवरही या वाहिन्या दिसतात.

टाटा स्काय, एअरटेल डिजिटल टिव्ही, डिश टिव्हीची सेवा काश्मीरमध्ये उपलब्ध आहे. मात्र खासगी केबल सेवा धारकांची काश्मीरमधील संख्या लक्षणीय आहे. ‘एकट्या श्रीनगरमधील खासगी केबल सेवा धारकांची संख्या ५० हजारांहून अधिक आहे. या केबलवरुन पाकिस्तानी आणि सौदीतील वाहिन्या दाखवल्या जात असल्यानेच ग्राहक केबल सेवा घेतात,’ अशी माहिती एका केबल ऑपरेटरने दिली.

झाकिर नाईकच्या पीस टिव्हीसोबतच अनेक उर्दू आणि इंग्रजी वाहिन्या चिथावणीखोर कार्यक्रम दाखवत आहेत. यामध्ये पाकिस्तान आणि सौदीतील वाहिन्यांची संख्या लक्षणीय आहे. सौदी सुन्नाह, सौदी कुरान, अल अरेबिया, पैगाम, हिदायत, नूर, मदानी, सेहर, करबाला, हदी, अहलीबात, मेसेज, फलक, जीओ न्यूज, डॉन न्यूज आणि इतर अनेक वाहिन्या प्रक्षोभक कार्यक्रम प्रसारित करत आहेत. सॅटेलाईट सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून या वाहिन्या प्रक्षेपित केल्या जात नाहीत. फक्त केबल ऑपरेटरकडून या वाहिन्या दाखवल्या जातात. विशेष म्हणजे देशाच्या इतर भागांमध्ये या वाहिन्या दाखवण्याची परवानगी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिलेली नाही.