एका रात्रीत नशीब फळफळणं काय असतं याची प्रचिती नुकतीच दोन व्यक्तींनी अनुभवली. मजुरीचे काम करुन रोजचे जीवन जगणाऱ्या दोघांना अचानक हिरा सापडल्याने ते अक्षरश: एका रात्रीत कोट्यधीश झाले. मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील दोन मजुरांच्या बाबतीत ही घटना घडली असून नवे वर्ष येण्याआधीच त्यांच्या आयुष्यात ही आनंददायी घटना घडली आहे. खाणीत काम करत असताना सापडलेला हिरा थोड्याथोडक्या नाही तर तब्बल २.५५ कोटींना विकला गेला. मोतीलाल आणि रघुवीर प्रजापती असं या दोन मजुराचं नाव आहे.

या दोघांनाही साधारणपणे दोन महिन्यांपूर्वी एक मोठा हिरा सापडला होता. हा हिरा अतिशय मौल्यवान आहे हे समजल्याने त्या दोघांनीही तो विकून त्याचे पैसे करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे मग हिऱ्याची बोली लागली. उत्तर प्रदेशमधील झांसीचे सोने व्यापारी असलेल्या राहुल जैन आणि बसपाचे नेते चरण सिंह यांनी मिळून ६ लाख रुपये प्रती कॅरेटप्रमाणे हा हिरा खरेदी केला. या हिऱ्याचे वजन ४२.९ कॅरेट होते, त्यामुळे या हिऱ्यासाठी २.५५ कोटी रुपये मोजले गेले. हिरा खरेदी केल्यानंतर खरेदीदारांनी २० टक्के रक्कम जमा केली आहे. उर्वरित रक्कम हिऱ्याचा ताबा मिळाल्यानंतर जमा करण्यात येणार असल्याचे पन्नाचे हिरा अधिकारी संतोष सिंह यांनी सांगितले.

आपल्याला मिळालेल्या या रकमेतून आपण डोक्यावर असलेले कर्ज फेडणार आहे तसेच मुलांना चांगले शिक्षण देणार आहे असे या मजुरांनी सांगितले. टक्के रॉयल्टी आणि अन्य टॅक्स कापल्यानंतर उर्वरित रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. खाणीत सापडलेला दगड जमा केल्यानंतर तो हिरा असेल असं वाटलं नव्हतं, तसेच आपण एका रात्रीत कोट्यधीश होऊ अशी कधी कल्पनाही केली नव्हती असे या दोन्ही मजुरांनी सांगितले. मजुरांनी मिठाई वाटून आपला आनंद साजरा केला. पन्नामध्ये अनेक लोक भाग्य उजळवण्यासाठी येतात. जिल्हा प्रशासनाकडे लीजवर खाण घेवून त्या ठिकाणी खाणकाम करतात. हिरा मिळाल्यानंतर तो जिल्हा हिरा अधिकारी यांच्याकडे जमा करतात. त्यानंतर प्रशासन त्या हिऱ्याची बोली लावतात.