मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ या महत्त्वाकांक्षी योजनेविषयी शंका उपस्थित करणाऱ्या टीकाकारांची तोंडे बंद होण्याची शक्यता आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका पाहणीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय उत्पादनांची मागणी वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्वस्त किंमतीमुळे चीनच्या उत्पादने नेहमीच वरचढ ठरत आली आहेत. मात्र, यंदा भारताने ‘मेड इन कंट्री इंडेक्स’च्या यादीत चीनच्या उत्पादनांनाही मागे टाकले आहे.

युरोपीय संघ आणि जगातील ४९ देशांचा समावेश असलेल्या ‘मेड इन कंट्री इंडेक्स-२०१७’ (MICI-2017)ची आकडेवारी सोमवारी जाहीर करण्यात आली. या आकडेवारीनुसार उत्पादनाच्या दर्जाबाबत भारत चीनच्या बराच पुढे आहे. भारतीय उत्पादनांनी यादीत ३६ गुणांसह ४२ वे स्थान पटकावले आहे. तर चीनला २८ गुणांसह ४९ व्या स्थानावर आहे. तर जर्मनीने या यादीत १०० गुणांसह अव्वल स्थान मिळवले आहे. ९८ गुण मिळवणारा स्वित्झर्लंड यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. पंतप्रधान मोदींनी २०१४ मध्ये सुरु केलेल्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेच्यादृष्टीने हे  आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मानले जात आहे.

‘मेड इन कंट्री इंडेक्स’च्या सर्वेक्षणात ५० देशातील उत्पादनांची गुणवत्ता, डिझाइन, आधुनिक तंत्रज्ञान, किंमतीची वसूली, वैशिष्ट्ये, सुरक्षेचे मापदंड, विश्वासार्हता, टिकाऊपणा आदींचे मुल्यमापन करण्यात आले. ४३०३४ उपभोक्त्यांनी दिलेल्या अभिप्रायांच्या आधारे हा सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये भारताच्या उत्पादनांना मिळणाऱ्या पसंतीचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याचे  दिसून आले आहे. तर स्त्रोतांच्या अनुलपब्धतेमुळे चीनी उत्पादनांमध्ये वापरण्यात येणारा कच्चा माल निकृष्ट दर्जाचा असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वैश्विक मापदंडाच्या कसोटीत चीनी उत्पादने नापास ठरत असल्याचे अहवालात म्हटले आहे.