अभिनेते, विचारवंत आणि लेखक गिरीश कर्नाड यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येला ५ सप्टेंबरला एक वर्ष पूर्ण झाले. गौरी लंकेश यांच्या स्मृती प्रीत्यर्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमात गिरीश कर्नाड यांच्या गळ्यात Me Too Urban Naxal अशी पाटी गळ्यात अडकवली होती. याचमुळे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बेंगळुरू हायकोर्टात वकील म्हणून काम करणाऱ्या एन. पी अमृतेश यांनी ही तक्रार दाखल केली आहे. गिरीश कर्नाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही या अमृतेश यांनी केली.
गिरीश कर्नाड यांनी Me Too Urban Naxal अशी पाटी गळ्यात अडकवून नक्षलवाद्यांच्या कारवायांचा आणि ते घडवत असलेल्या हिंसाचाराचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला आहे. नक्षलवादालासंदर्भातली पाटी कोणी आपल्या गळ्यात घालूच कसे शकते? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
गौरी लंकेश यांच्या घराबाहेर ५ सप्टेंबरला एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गिरीश कर्नाड यांच्यासह अनेक विवेवादी चळवळीतल्या लोकांचाही सहभाग होता. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपांवरून ज्या पाच जणांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे त्याविरोधातही या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. याचवेळी गिरीश कर्नाड Me Too Urban Naxal अशी पाटी गळ्यात अडकवून आले होते.