दिल्लीमधील बुराडी आत्महत्या प्रकरणाला एक नवीन वळण मिळण्याची शक्यता निर्माण झालीये. भाटिया कुटुंबातील ११ जणांचा मृत्यू झाला असून ही आत्हमत्या असल्याचा ठोस पुरावा असताना यामध्ये अजून एक म्हणजे १२ वी व्यक्ती सहभागी असल्याचा संशय आहे. पोलिसांच्या हाती अजून काही नोट्स सापडल्या आहेत ज्या २००७ मध्ये लिहिण्यात आल्या आहेत. या नोट्सवरुन तरी हे कुटुंब २००७ पासून अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याचं समोर येत आहे.

घराचा मुख्य दरवाजा उघडा का होता ? यामागे काय कारण असावं यासंबंधी सांगताना तपास अधिकाऱ्याने माहिती दिली की, ‘आम्ही दोन शक्यता पडताळून पाहत आहोत. एकतर दैवी शक्ती त्यांना वाचवण्यासाठी दरवाजातून प्रवेश करेल असं वाटलं असावं किंवा १२ वी व्यक्ती घरात उपस्थित असावी’.

पोलिसांनी घरात तपासणी करताना २००७ मधील जुन्या नोट्स सापडल्या असल्याची माहिती दिली आहे. घरातील कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्यानंतर हाताने या नोट्स लिहिण्यात आल्या होत्या. ‘मृत्यूमुळे घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. मुलगा ललित भाटिया सर्वात जास्त धक्क्यात होता’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोस्टमॉर्टमनुसार, ११ जणांचा मृत्यू गळफास लागल्याने झाला आहे. यापैकी १० जणांनी पाच स्टूल शेअर केले होते. फक्त घरातील वयस्कर महिला ७७ वर्षीय नारायण देवी एका वेगळ्या रुममध्ये आढळल्या होत्या. त्यांना विष दिलं गेलं होतं का याचीही तपासणी सुरु आहे. कुटुंबातील इतर सदस्यांनी दुसऱ्यांना गळफास घेण्यास मदत केली. कोणाच्याही शरिरावर जबरदस्ती करण्यात आल्याचा पुरावा नाहीये.

कोणाच्याही शरिरावर गळ्यावर वगळता दुसरीकडे कुठेही कोणती खूण नाहीये. काही जणांचं पोट रिकामं असून, काहींनी जेवण केलं होतं. पोलिसांनी तपासात अद्याप कोणत्याही बाबा किंवा तांत्रिकाचं नाव समोर आलं नसल्याचं सांगितलं आहे. पोलिसांनी घरातील मुलगा ललित या सामूहिक मृत्यूमागील मास्टमाइंड असल्याचा संशय व्यक्त केला आहे. ललित स्वप्नात आपले वडिल गोपालदास यांच्याशी गप्पा मारत असे. धक्कादायक म्हणजे गोपालदास यांचा १० वर्षांपुर्वीच मृत्यू झाला आहे. वडिल सांगतील त्या सर्व गोष्टी ललित रजिस्टरमध्ये लिहून ठेवत असे. ज्याप्रमाणे ‘मी उद्या किंवा परवा येईल. नाही आलो तर नंतर येईन. तुम्ही ललितची चिंता करु नका, मी जेव्हा येतो तेव्हा तो थोडा चिंतीत असतो’.

ललित २०१५ पासून रजिस्टरमध्ये लिहित होता. त्याला रोज नाही मात्र कधीकधी स्वप्न पडायची. दोनपैकी एक रजिस्टर पूर्ण भरलं आहे, तर दुसरं अर्ध भरलं आहे. मृत्यूची तारीख आधीच निश्चित करण्यात आली होती. मृत्यूआधी बाहेरुन २० चपात्या मागवण्यात आल्या होत्या.

याप्रकरणी सह-पोलीस आयुक्त आलोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात तरी या प्रकरणात कोणत्या बाबा किंवा तांत्रिकाचा हात असेल असं वाटत नाही. आम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांचे कॉल डिटेल्स तपासत आहोत. घरातील दरवाजे ज्याप्रकारे उघडे दिसले आहेत, त्यावरुन कोणी तांत्रिक आला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण सर्व आत्महत्या दरवाजा बंद करुन केल्या जातात. पण एखादा तांत्रिक इतक्या लोकांना आत्महत्या करायला का लावेल हादेखील प्रश्न आहे.

मात्र अद्यापही कोणी बाहेरची व्यक्ती घरात आल्याचा कोणताही पुरावा हाती लागलेला नाही. रजिस्टमध्ये ज्याप्रकारे लिहिलं गेलं आहे की, ‘सर्व लोक आपले हात पाय बांधतील आणि काम पूर्ण झाल्यावर एकमेकांचे हात खोलतील’. यावरुन तरी कुटुंबातील सदस्यांना आपण मृत्यूला कवटाळत आहोत याची कल्पना नसावी असं वाटत आहे. सर्वजण अंधविश्वासाचा हा खेळ डेमो म्हणून खेळत असावेत. त्यांना हे काम संपल्यानंतर आपण जिवंत राहू असं वाटलं असावं. आतापर्यंतच्या तपासानुसार ललित या सगळ्याचा मास्टमाइंड असल्याचं वाटत आहे.

मृतांची ओळख नारायण देवी (७७), त्यांची मुलगी प्रतिभा (५७), दोन मुलं भावनेश (50) आणि ललित भाटिया (४५) अशी झाली आहे. भावनेशची पत्नी सविता (४८) आमि त्यांची तीन मुलं मीनू (२३), निधि (२५) आणि ध्रुव (१५), ललित भाटियाची पत्नी टीना (४२) आणि त्यांचा १५ वर्षीय मुलगा शिवम , प्रतिभाची मुलगी प्रियंका (३३) देखील मृत अवस्थेत सापडले आहेत. प्रियंकाचा गेल्या महिन्यात साखरपुडा झाला होता. वर्षाच्या शेवटी तिचं लग्न होणार होतं.