वादग्रस्त मद्यसम्राट पॉण्टी आणि स्वतंत्र राहणारा त्याचा भाऊ हरदीप यांनी संपत्तीच्या वादातून परस्परांवर केलेल्या गोळीबारात दोघेही ठार झाले. दक्षिण दिल्लीतील छत्तरपूर भागात ही घटना घडली.
हरदीप, पॉण्टी आणि राजिंदर असे तीन चढ्ढा बंधू पूर्वी ‘चढ्ढा ग्रुप’ या नावाने ओळखला जाणारा ६००० कोटींचा व्यवसाय सांभाळत होते. मल्टिप्लेक्स, साखर कारखाने, मुद्रणालये, बांधकाम व्यवसाय, कुक्कुटपालन, चित्रपटनिर्मिती अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांचा व्यवसाय विस्तारला होता.
या तीन भावांपैकी हरदीप आणि पॉण्टी यांच्यात संपत्तीच्या वाटपावरून टोकाचे मतभेद होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी पॉण्टी याने बोलाविल्यामुळे हरदीप छत्तरपूर येथील फार्म हाऊसवर गेले होते. मात्र संपत्तीवाटपाची बोलणी फिसकटत गेली. यामुळे चिडलेल्या हरदीपनी आपल्याच भावावर गोळीबार केला. हे दृश्य पाहून पॉण्टी याचे सुरक्षारक्षक संतप्त झाले आणि त्यांनी हरदीप यांच्यावर प्रतिहल्ला केला. दोन्ही पक्षांकडून बेछूट गोळीबार केला गेला. बंदुकीच्या किमान ३०-४० फैरी यावेळी झाडल्या गेल्या. या गोळीबारात हरदीप आणि पॉण्टी दोघेही ठार झाले.
पॉण्टी याच्या शरीरात ६ गोळ्या आढळल्या. ५ ऑक्टोबरलाही पॉण्टी याच्या मोरादाबाद येथील घरात गोळीबार झाला होता, तर काही महिन्यांपूर्वी, आयकर विभागाने धाडी टाकल्याने ते चर्चेत होते. पोलिसांनी घटनास्थळाहून २ पिस्तुले जप्त केली असून न्यायवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथकही घटनास्थळी तातडीने रवाना झाले.