एका नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला आपल्या पतीकडे 10 रुपयांची मागणी करणं इतकं महागात पडलं की तिला जीव गमवावा लागला. 10 रुपयांच्या मागणीवरुन सुरू झालेला वाद चिघळल्यानंतर पतीने पत्नीच्या थोबाडीत लगावली. त्यानंतर जवळील लाकडाच्या फळीने त्याने पत्नीला मारहाण सुरू केली, यामध्ये ती गंभीर जखमी झाली. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केलं. उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमध्ये ही धक्कदायक घटना घडली.

गोपालपूर नवाजगढ गावातील रहिवासी संतोष हा गुरूवारी सकाळी जवळपास सात वाजण्याच्या सुमारास काही कामानिमित्त घराबाहेर जाण्याच्या तयारीत होता. तेवढ्यात त्याची पत्नी बबिता त्याच्याजवळ आली आणि तिने 10 रुपयांची मागणी केली. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, संतोषने पैसे देण्यास नकार दिला, त्यानंतर दोघांमध्ये वादाला सुरूवात झाली. रागाच्या भरात संतोषने बबिताच्या थोबाडीत लगावली. त्यामुळे चिडलेल्या बबिताने जवळ पडलेली लाकडाची फळी उचलली आणि संतोषच्या दिशेने धाव घेतली. संतोषने बबिताच्या हातातून लाकडाची फळी हिसकावून घेतली आणि त्याच फळीच्या सहाय्याने त्याने तिला मारहाण सुरू केली. जबर मारहाण केल्याने गंभीर जखमी झालेल्या बबिताला रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केलं. गावकऱ्यांनी घटनेची माहिती मृत महिलेच्या माहेरी दिली. त्यानंतर माहेरची मंडळी गावात आली आणि त्यांनी बबिताचा पती संतोष आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप या प्रकरणात पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही.