आयएनस सुमित्राचे कमांडर मिलिंद मोकाशी, पूर्व नौदल ताफ्याचे प्रमुख सुनील भोकरे
येत्या शनिवारी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनासाठी विशाखापट्टणम येथील नौदल गोदीच नव्हे तर संपूर्ण शहर सज्ज झाले आहे. राष्ट्रपतींच्या युद्धनौकेचा मान मिळालेल्या आयएनएस सुमित्राची धुरा कमांडर मििलद मोकाशी यांच्याकडे तर ज्या पूर्व नौदल ताफ्याच्या अधिछत्राखाली हे आयएफआर पार पडते आहे, त्याची धुरा पूर्व नौदल ताफ्याचे प्रमुख म्हणून मूळचे जळगावचे असलेल्या रिअर अ‍ॅडमिरल सुनील भोकरे यांच्या हाती आहे. आयएफआर समस्त भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब असली तरी त्यातील कर्तृत्ववान मराठी अधिकाऱ्यांमुळे मराठी माणसाची मान थोडी अधिक उंचावलेली असेल.
‘आयएनएस सुमित्रा’, ‘आयएनएस सुमेधा’ व ‘आयएनएस सुनयना’ यांचा समावेश राष्ट्रपतींच्या युद्धनौकांच्या ताफ्यात करण्यात आल्याने या सर्व युद्धनौकांना अशोकस्तंभावरील तीन सिंह असलेली देशाची राजमुद्रा मिरवण्याचा मान मिळाला आहे. राष्ट्रपतींच्या ताफ्यातील या युद्धनौकांसह विशाखापट्टणमपासून काही अंतरावर खोल समुद्रात गुरुवारी आयएफआरसाठीची अंतिम रंगीत तालीम पार पडली. या सोहळ्याला नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल रॉबिन धोवन जातीने हजर होते. मुख्यमंत्री, पंतप्रधान व अखेरीस राष्ट्रपती यांच्या आगमनानुसारच कार्यक्रमाची रंगीत तालीम पार पडली. तिन्ही सेनादलांचे प्रमुख असलेल्या राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ राष्ट्रपतींचा नौदल ध्वज त्यांच्याच समोर किंवा रंगीत तालमीदरम्यान झुकवला जातो, तो दुर्मीळ क्षणही गुरुवारी अंतिम रंगीत तालमीसाठी हजर राहिलेल्या विशेष उपस्थितांना अनुभवता आला. रिअर अ‍ॅडमिरल भोकरे हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) व डिफेन्स सíव्हसेस स्टाफचे छात्र असून ते पाणबुडीतज्ज्ञ आहेत. याशिवाय युद्धनौकांचे परिचालन आणि लढाऊ विमानांचे दिशादर्शन यामधील ते तज्ज्ञ आहेत. तर राष्ट्रपतींच्या या युद्धनौकेचे सारथ्य करणारे कमांडर मिलिंद मोकाशी हे या युद्धनौकेचे पहिलेच कमांडिंग अधिकारी आहेत.