पीटीआय, फतेहगड साहिब/पटियाला

देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असेल, तर लोकांच्या जीवनात समृद्धी का नाही, असा सवाल करत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकावर जोरदार टीका केली.

फतेहगढ साहिब मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अमरसिंग यांच्या प्रचारसभेत प्रियंका गांधी बोलत होत्या. पंतप्रधान मोदी हे केवळ सत्ता मिळवण्यासाठी खोटे बोलत आहेत. त्यांनी जनतेला खोटी आश्वासने दिली आहे, असा हल्लाबोल करताना त्या म्हणाल्या की, देशात ७० कोटी तरुण बेरोजगार आहेत आणि बेरोजगारी ही ४५ वर्षांतील सर्वाधिक आहे. मोदी यांच्या केंद्रातील सरकारच्या काळात सरकारी क्षेत्रात ३० लाख पदे रिक्त आहेत. अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत असल्याचे मोदी टप्प्याटप्प्याने मोठे दावे करतात. मला विचारायचे आहे की, अर्थव्यवस्था इतक्या वेगाने वाढत आहे आणि देशात प्रगती होत असेल तर जनतेची प्रगती का होत नाही, असा सवाल त्यांनी विचारला.