ढाका : बांगलादेशचे माहिती आणि प्रसारणमंत्री हसन महमूद यांनी म्हटले आहे की, भारतात उद्भवलेला प्रेषित मोहम्मद यांच्याविषयीच्या अवमानकारक विधानाचा वाद हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे त्यात बांगलादेश सरकारने प्रतिक्रिया देण्याचे काही कारण नाही. हा बांगलादेशसाठी बाहेरचा मुद्दा आहे. तो भारताचा प्रश्न आहे, बांगलादेशचा नाही. यावर आम्हाला काहीही बोलायचे नाही, असे त्यांनी सांगितले.

ते शनिवारी सायंकाळी ढाका येथे भारतीय पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करीत होते. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. या प्रकरणात योग्य ती कार्यवाही केल्याबद्दल त्यांनी भारतातील अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. हा वाद आम्ही पुढे वाढवणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

अन्य मुस्लीम देशांनी या वादात भारताकडे तीव्र प्रतिक्रिया नोंदवली असताना बांगलादेश तडजोडीचे धोरण स्वीकारत आहे काय, अशी विचारणा केली असता, ते म्हणाले की, प्रेषितांचा अवमान आम्ही कधीही सहन करणार नाही, पण भारत सरकारने यात योग्य कारवाई केली  आहे, तेथील कायद्यानुसार पुढेही कारवाई जाईल. त्यामुळे आम्ही या प्रकरणात कोणतीही तडजोड करीत आहोत, असे म्हणता येणार नाही.